अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:55 IST2025-12-12T16:51:43+5:302025-12-12T16:55:05+5:30
अनुयायांना पाणी, स्वच्छतागृह, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ड्रोन, सीसीटीव्ही, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील

अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पुणे: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी विविध संघटनांना विश्वासात घेऊन यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे शहर पोलिस उपायुक्त सोमय मुंढे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, वाहतूक पोलिस आयुक्त हिंमत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, “विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, औषधोपचार सेवा, ड्रोन, सीसीटीव्ही, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अनुयायांची कोणताही प्रकारची गैरसोय होणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही सूचना असल्यास प्रशासनाला कळवाव्यात, त्याचा यावर्षीचा नियोजनात समावेश करण्यात येईल.”
सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकरिता कार्यक्रमस्थळी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष तसेच अनुयांयाच्या तक्रारीची दखल घेण्याकरिता तक्रार निवारण कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वीच्या आणि यावर्षीच्या आराखड्याचा तुलनात्मक अभ्यास करून त्यामध्ये तफावत असल्यास यावर्षीच्या आराखड्यात तशा सुधारणा कराव्यात. कार्यक्रमाकरिता होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ लावण्याकरिता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी, ती समिती लेखापरीक्षण अहवाल प्रशासनाला सादर करतील. पोलिस विभागाशी समन्वय साधून विजयस्तंभाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर चोख वाहतूक नियोजन करण्यात येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सुचविले.
पाटील म्हणाले, आषाढी वारीच्या धर्तीवर अनुयायांना सोई-सुविधा पुरविण्यात येतील, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सोहळा सुरळीतपणे पार पाडण्याकरिता पुरेशा मनुष्यबळ, साधनसामुग्री, शौचालय, टँकर, स्वच्छता, पाणीपुरवठा, आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, गतवेळीपेक्षा यावेळी शौचालयांची संख्या वाढविण्यात आली आहे, असेही पाटील म्हणाले.