'राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय साहेब आणि दादांचा, ते दोघे...' युगेंद्र पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:41 IST2025-04-23T17:39:04+5:302025-04-23T17:41:10+5:30
राजकारणात ‘दादां’नी वेगळा निर्णय घेतला असला तरी ते माझे काका असल्याने ते दोघे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल

'राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय साहेब आणि दादांचा, ते दोघे...' युगेंद्र पवार स्पष्टच बोलले
बारामती : लहान असल्यापासून त्या माझ्या काकी आहेत. ३२ वर्षे आम्ही राजकारण आणि कुटुंबात एकत्र होतो. एखादं वर्ष आमचं असं गेलं, म्हणजे सगळं संपलं या विचारांचा मी नाही, माझ्या काकीदेखील नाहीत. पाॅलिटीकल फिल्डवर काही घडलं असलं तरी देखील माझ्या मनातील काका - काकी यांच्याविषयीचा आदर कायम आहे. आजही ते माझे काकाच आहेत. कुटुंब म्हणून तो कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांनी मांडली.
तुम्ही सुनेत्रा पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला? या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, “पवार कुटुंब एकत्रच आहे. शेवटी रक्ताचं नातं आहे. मात्र, राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय ‘साहेब’ आणि ‘दादां’चा आहे. ते दोघं ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. राजकारणात ‘दादां’नी वेगळा निर्णय घेतला असला तरी ते माझे काका आहेत. पवार कुटुुंबाचे सदस्य आहेत. माझ्या वडिलांचे ते सख्खे भाऊ आहेत. राजकारण सर्वच गोष्टींमध्ये नसावं. कुटुंब वेगळंच असतं. राज्यातील राजकारणातील इतर कुटुंबे काैटुंबिक कार्यक्रमांत एकत्र येतात. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. ती परंपरा आम्हीही पुढे चालवू, असे युगेंद्र पवार म्हणाले.
पवार कुटुंबाने राजकारण आणि कुटुंब नेहमीच वेगळं ठेवलं. ५३ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही संस्था निर्माण केली. यामध्ये माझे काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्था पुढे नेण्यासाठी खूप चांगले काम केले. काकी सुनेत्रा पवार यांनीदेखील चांगले काम केले, अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेेत्रा पवार यांचे काैतुक केले.