पुणे: हिरक महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ही स्पर्धा दि. १० ते २४ ऑगस्ट दरम्यान होणार असून, याचे अर्जवाटप साेमवारी (दि. १४) आणि मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळात संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात होणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळात नातू वाडा शनिवार पेठ येथे जमा करायचे आहेत. स्पर्धेचे लॉटस् दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता सुदर्शन रंगमंच येथे काढण्यात येतील. प्रत्यक्ष स्पर्धा दि. १० ते २४ ऑगस्ट दरम्यान भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा होणार आहे. अंतिम फेरी दि. १३ व दि. १४ सप्टेंबरला हाेणार असून, पारितोषिक वितरण समारंभ दि. १९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे, अशी माहिती आयाेजकांनी दिली.
सतीश आळेकर लिखित ‘महापूर’चा शुक्रवारी प्रयोग
महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या ३१व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सतीश आळेकर लिखित ‘महापूर’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (दि. १८) रोजी सायंकाळी ६:३० वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित केला आहे. हा प्रयोग सर्वांसाठी खुला असून, प्रवेशिका आवश्यक आहे. ऋषी मनोहर दिग्दर्शित या नाटकात आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर यांच्या भूमिका आहेत.
स्पर्धेचा इतिहास पुस्तकरूपात
महाराष्ट्रीय कलोपासक आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून, महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांची मुलाखत त्यावेळी घेतली जाणार आहे.