हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:54 IST2025-10-06T12:53:51+5:302025-10-06T12:54:38+5:30
या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही

हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप
लोहगाव : लोहगाव येथील शनिवारी (दि.४) गाथा लॅान्स येथे वडगावशेरीचे शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे व अजित पवार गटाचे माजी सरपंच बंडू शहाजी खांदवे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीची घटना घडली. यात बंडू खांदवे यांनी घडवलेला हा हल्ल्याचा कट पूर्वनियोजित असल्याचा आरोप आमदार पठारे यांनी केला.
खरडी येथील त्यांच्या निवासस्थानी रविवारी (दि.५) त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हा प्रकार केल्याचे दिसते. खांदवे विचलित झालेले असून त्यामुळे ते मुद्दामहून भांडण करत असल्याचे ते म्हणाले. पठारे पुढे म्हणाले, ज्यावेळी माझा चालक शकील शेख याला मारहाण केली. त्यावेळी दोन ते तीन मिनिटांतच अनेक कार्यकर्ते तेथे आले. ते सुनील टिंगरेंचे कार्यकर्ते होते का? असा प्रश्न विचारला असता ‘हो, ते सुनील टिंगरेचेच कार्यकर्ते होते’ असे उत्तर पठारे यांनी दिले.
आम्ही राजकीय जीवनात कधीच ड्रेनेज, पाणी पाइपलाइन न टाकता रस्ते केले नाहीत. रस्त्याच्या कामांना उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि सुनियोजित हल्ला करून मीडियाला खोट्या प्रतिक्रिया त्यांनीच द्यायच्या. गावातील काही लोक बोलावून काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. चालक शकील शेख हे खासगी रुग्णालयात भरती असल्याने त्यांचा जबाब रात्री होऊ शकला नाही; परंतु शासकीय कर्मचारी म्हणून तक्रार दाखल केली आहे. पुतण्या सचिन पठारे यालाही मारहाण केली गेली. या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवार यांना पत्र देणार असल्याचे पठारे यांनी सांगितले. या प्रकरणी दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता. कार्यकर्ते जोशात होते; परंतु आम्हीच त्यांना समजावले. त्यामुळे वातावरण निवळले. आमची भूमिका वाईट नाही, त्यांची असेल तर जनता त्यांना धडा शिकवेल, असे बापू पठारे यांनी पत्रकार परिषदेत सुनावले. सुरेंद्र पठारे निवडणूक लढवणार यामुळे हे घडले का ? या प्रश्नावर पठारे म्हणाले, कुणीही कुठेही लढू शकतो; परंतु त्याचा त्रागा करून अशी मारहाण करणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.