शाब्दिक खडाजंगीत "सोमेश्वर"च्या वार्षिक सभेचा शेवट; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:26 IST2025-10-01T10:26:12+5:302025-10-01T10:26:58+5:30
- इथेनॉल निर्मिती आणि सोलर पॉवर प्रकल्पाला मंजुरी मिळाली

शाब्दिक खडाजंगीत "सोमेश्वर"च्या वार्षिक सभेचा शेवट; नेमकं काय घडलं ?
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २९) कारखान्याच्या कार्यस्थळावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत इथेनॉल निर्मिती आणि सोलर पॉवर प्रकल्पाला मंजुरी मिळाली; परंतु ऊस दर, शिक्षण संस्था आणि इतर विषयांवर सभासद आणि संचालकांमध्ये तर्कवितर्क झाले. सभेच्या शेवटी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे आणि अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.
सभेत उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी यंत्रसामग्रीत बदल करण्याचा आणि सोलर पॉवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय सभासदांनी मंजूर केला. इथेनॉल प्रकल्पासाठी १३ कोटी ९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, यासाठी ७० टक्के रक्कम जिल्हा बँकेकडून आणि ३० टक्के स्व-भांडवलातून उभारली जाईल. सोलर पॉवर प्रकल्पासाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष जगताप यांनी दिली.
ऊस दराबाबत स्पष्टीकरण देताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले, “इतर कारखाने कर्ज काढून दर देतात. पण, आम्ही तोटा टाळून साखर मूल्यांकनानुसार रास्त दर देतो. गत हंगामात साखर निर्यात, उपपदार्थ आणि बगॅस विक्रीतून चांगला नफा मिळाला. परंतु, यंदा बगॅसचे दर आणि उत्पादन घटले, तसेच साखर कर्जावरील व्याज वाढले. त्यामुळे दरात १६० रुपये प्रतिटन फटका बसला आहे.” त्यांनी जास्त दराची मागणी करणाऱ्यांना तोटा न होता ५० रुपये वाढवून दाखवण्याचे आव्हान दिले.
माजी सभापती प्रमोद काकडे यांनी १७१ रुपये कमी दर दिल्याचा आरोप केला, तर राजेंद्र जगताप यांनी अंतिम दरात २०० रुपये वाढवण्याची मागणी केली. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी २०० रुपये वाढ अशक्य असल्याचे स्पष्ट केले. भाजप नेते दिलीप खैरे यांनीही २०० रुपये वाढ आणि सभासदांना दिवाळीला साखर देण्याची मागणी केली.
गणेश फरांदे यांनी गत हंगामातील आगीमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कारखान्याच्या मालकीचे अग्निशमन वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला विक्रम भोसले यांनी पाठिंबा दिला.
शिक्षण संस्था आणि इतर विषयांवर चर्चा
धैर्यशील काकडे यांनी माळेगाव कारखान्याच्या संचालक भत्त्याची तुलना करत सोमेश्वरच्या ६० लाख रुपये भत्त्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच पेट्रोल पंपावरील उधारी बंद करणे आणि ऊस न घालणाऱ्या सभासदांना साखर न देण्याची मागणी केली. यावर जगताप यांनी उधारी बंद केल्याचे आणि बाहेर ऊस घालणाऱ्या सभासदांना ३० किलो साखर आणि इतर सवलती न देण्याचा निर्णय जाहीर केला. शिक्षण संस्थेत प्रत्येक गावातून एक सदस्य घ्यावा आणि कामगार भरतीत सभासदांवर अन्याय होत असल्याची नाराजीही व्यक्त झाली.
सभेचा शेवट वादात
सभेच्या शेवटी सतीश काकडे यांनी शिक्षण संस्थेच्या विषयावर खुलासा मागताना गोंधळ घातल्याने सभा संपवावी लागली. यावेळी माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, सिद्धार्थ गीते, भाजप नेते दिलीप खैरे, दत्ताआबा चव्हाण यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. विषयपत्रिकेचे वाचन सचिव कालिदास निकम यांनी केले, तर मुख्य लेखापाल योगीराज नादखिले यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले.