Gudhi Padwa 2025: पंचांगकर्ते म्हणतात, ऊन वाढण्यापूर्वी उभी करावी मांगल्याची गुढी!
By नम्रता फडणीस | Updated: March 28, 2025 17:51 IST2025-03-28T17:51:01+5:302025-03-28T17:51:19+5:30
गुढी उभारल्यानंतर घरातील स्वयंपाकाचा नैवेद्य गुढीला दाखवावा, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुटुंबीयांसमवेत एकत्रित मिष्टान्न भोजनाचा आनंद घ्यावा

Gudhi Padwa 2025: पंचांगकर्ते म्हणतात, ऊन वाढण्यापूर्वी उभी करावी मांगल्याची गुढी!
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला रविवारी (३० मार्च) सूर्योदयानंतर सकाळी लवकर म्हणजेच ऊन वाढण्यापूर्वी मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारावी. सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून गुढी उतरवावी. या दिवसापासून मराठी नववर्षारंभ होत असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते.
‘गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करून, आंब्याच्या पानांची तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी विशेष तयारी सुरू आहे. घरोघरी गुढी उभारून मांगल्याची, भरभराटीची आणि समृद्धीची कामना करण्यात येते, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.
आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून संवत्सराच्या आरंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्यासाठी कोणतेही बंधन नाही, त्यामुळे गुढीपूजन आणि पंचांगपूजन अवश्य करावे, गुढीपूजन करण्यासाठी कोणताही विधी नाही आणि मुहूर्तदेखील नाही.
आपल्या कुलाचारानुसार आपल्या सोयीनुसार गुढीपूजन करावे. गुढी उभारल्यानंतर घरातील स्वयंपाकाचा नैवेद्य गुढीला दाखवावा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुटुंबीयांसमवेत एकत्रित मिष्टान्न भोजनाचा आनंद घ्यावा. या सणाच्या निमित्ताने वेगळे राहणारे भाऊ आणि कुटुंबीयांनी एकत्र येत नववर्षारंभाचा दिवस गुण्यागोविंदाने साजरा करावा, असेही मोहन दाते यांनी सांगितले.