राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 10:52 IST2021-07-12T10:51:50+5:302021-07-12T10:52:12+5:30
एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या पाच साथीदारांनी काटा काढल्याचा पोलिसांचा अंदाज

राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून
राजगुरूनगर: विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असलेला तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर ,वय २८, याचा दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे.
पप्पु वाडेकर याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले होते.
रविवारी (दि ११) रात्री तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यास राजगुरूनगर येथे आला होता.संशयित आरोपी व त्याच्यात दोनदा जोरदार भांडणे झाली होती. रविवारी त्याला राजगुरूनगर येथील खेड कनेरसर मार्गावर रोड परिसरात त्याला आरोपींनी गाठले. रोडलगत एका झाडाखाली आरोपीना वाडेकर याला दगडाने ठेचून खून केला. घटनास्थळी जिल्हा ग्रामिण अधिक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असुन लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.