JNU: सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:42 IST2025-08-30T15:41:13+5:302025-08-30T15:42:05+5:30
मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केली

JNU: सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार
पुणे: कोणताही नोकरदार, शिक्षक किंवा प्राध्यापकाला नियमित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य कारणांमुळे सुट्टी घ्यावी लागू शकते. मात्र, मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केल्याचा प्रकार समोर आला आहे.
डॉ. रोहन चौधरी असे या प्राध्यापकाचे नाव आहे. प्राध्यापक डॉ. चौधरी यांची नियुक्ती मार्च २०२४ मध्ये झाली. त्यानंतर १२ महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीवर ते विद्यापीठात रूजू झाले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, अचानक त्यांना न सांगता सहा महिन्यांनी हा कालावधी वाढविण्यात आला. दरम्यानच्या काळात ते सुटीवर होते. त्यांनी सांगितलेल्या तारखेप्रमाणे विद्यापीठात रूजू होणे अपेक्षित होते. मात्र, एक वर्षाच्या मुलाची तब्येत बिघडली, मुलाला १०४ ताप होता. त्याला सोडून कामावर रूजू होणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉ. चौधरी यांना नियमित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काही दिवस वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घ्यावी लागली. यासंदर्भात त्यांनी विभागप्रमुखांना दूरध्वनी करून माहिती दिली होती. मात्र, या काळात त्यांना ई-ऑफिसवर लॉगइन करून रजेचा अर्ज करण्यास वेळ मिळाला नाही. त्यानंतर ते रूजू झाले. पुढील काही महिने याबाबत काहीच घडले नाही. मात्र, २०२५ मध्ये कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी डॉ. चौधरी यांच्या रजेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीने डॉ. चौधरी यांनी ५१ दिवसांची सुट्टी घेतली असून, रजेचे व 'सीसीएस' नियमांचे उल्लंघन केले, असा उल्लेख अहवालात केला आहे. मात्र, नेमके कोणते नियम मोडले याचा ठोस संदर्भ दिलेला नाही. डॉ. पंडित यांनी २७ ऑगस्टला कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. चौधरी यांच्या सेवासमाप्तीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर इतर सदस्यांना मत मांडता येऊ नये, म्हणून त्यांचे माइक बंद ठेवण्यात आले होते; त्याचप्रमाणे बैठकीत कोणालाही बोलू दिले नाही. डॉ. चौधरी यांच्यावरील कारवाई ही नियम आणि कायद्याच्या विरोधात आहे, असे म्हणणे लिखित स्वरूपात सदस्यांनी कुलसचिवांकडे दिले आहे. दरम्यान, यासंदर्भात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.