टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:21 IST2025-09-23T12:19:45+5:302025-09-23T12:21:41+5:30
नाना पेठेत संत कबीर चौक, मासळी बाजार आणि परिसरातील वस्तीत आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत अतिक्रमण केले, स्टॉल, टपऱ्या सुरू केल्या होत्या

टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई
पुणे : आयुष कोमकर खूनप्रकरणी पुणेपोलिसांनी बंडू आंदेकर यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर सोमवारी पुणे महापालिकेने पोलिसांच्या मदतीने आंदेकर टोळीचा प्रभाव असलेल्या नाना पेठेतील विविध अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत टपऱ्या, स्टॉल, अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाचा खून केल्याच्या आरोपातून आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह २० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नाना पेठेत बंडू आंदेकरची दहशत असून, तेथील व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचेही तपासात समोर आले आहे. नाना पेठेत संत कबीर चौक, मासळी बाजार आणि परिसरातील वस्तीत आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत अतिक्रमण केले, स्टॉल, टपऱ्या सुरू केल्या होत्या. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
नाना पेठेत आंदेकर कुटुंबाचे उदात्तीकरण करणारे अनेक अनधिकृत फ्लेक्स लागले होते. गेल्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर या भागात त्यांच्या फोटोसह सुशोभीकरण केला लोखंडी फलक लावण्यात आला होता. आंदेकर यांच्या प्रभाव क्षेत्राखालील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी महापालिकेला कळवले होते. त्यानुसार, सोमवारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य अतिक्रमण विभाग, आकाश चिन्ह विभाग, बांधकाम विभागाने या अतिक्रमण व अवैध बांधकामावर कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मासळी बाजारात कारवाई केली होती. दरम्यान, शहरात कोणत्याही भागात कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाकडून त्याची अधिकृतपणे माहिती दिली जाते. मात्र, या कारवाईची माहिती देण्यात आली नाही. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भवानी क्षेत्रीय कार्यालयाकडे याची माहिती असल्याचे सांगितले, तर सहायक आयुक्तांनी कारवाई झाल्याचे मान्य केले. मात्र, संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.