पुणे : सध्या शहराच्या तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डाॅ. नीलिमा बाेराडे यांनी केले आहे.
उन्हात शारीरिक श्रमाची अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो. मळमळ, उलटी, हाता-पायात गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धवस्था ही याची लक्षणे आहेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे, डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादींचा वापर करावा, हे प्रतिबंधात्मक उपाय करावे.
प्राथमिक उपचार करावे
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड करून पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कूलर्स, एयर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान तपासावे व ३६.८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. रुग्णाने नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात अथवा खासगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.