करचोरी, बोगस खरेदी आणि बेहिशेबी रोकड व्यवहार; पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:11 IST2025-12-03T10:10:40+5:302025-12-03T10:11:04+5:30
पुण्यातील रामी ग्रँड हे शिवाजीनगरातील पंचतारांकित हॉटेल असून, लक्झरी राहणीमान व कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी लोकप्रिय आहे

करचोरी, बोगस खरेदी आणि बेहिशेबी रोकड व्यवहार; पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी
पुणे : पुणे आणि मुंबईतील नामांकित रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाने मंगळवारी (दि.२) पहाटेपासून छापे टाकले. करचोरी, बोगस खरेदी आणि बेहिशेबी रोकड व्यवहारांच्या संशयावरून देशभरातील ३० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. पुण्यातील आपटे रोडवरील रामी ग्रँड हॉटेलवरही छापे टाकण्यात आले असून, परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुंबईतील दादर येथून १९८५ मध्ये सुरू झालेला रामी ग्रुप ‘बॉम्बे अड्डा’सारख्या लोकप्रिय स्थळांसाठी ओळखला जातो. पुण्यातील रामी ग्रँड हे शिवाजीनगरातील पंचतारांकित हॉटेल असून, लक्झरी राहणीमान व कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी लोकप्रिय आहे. आयकर विभागाच्या कारवाईत तपास पथकाने दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक डेटा, खातेपुस्तके, कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची तपासणी केली. या कारवाईचा फटका ग्रुपचे संस्थापक राज शेट्टी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांनाही बसला आहे.
रामी ग्रुपवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. आयकरने मंगळवारी केलेल्या कारवाई प्रामुख्याने करचोरी आणि बेहिशेबी आर्थिक व्यवहारांवर केंद्रित होती, असे सूत्रांनी सांगितले. आयकरचे अधिकारी सकाळपासून हॉटेलमधील विविध विभागांची तपासणी करत होते, तसेच आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप असल्याचे नमूद करण्यात आले आहे.