लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला

By नम्रता फडणीस | Updated: March 26, 2025 18:11 IST2025-03-26T18:10:05+5:302025-03-26T18:11:07+5:30

बांगड्यांचे दुकान असणाऱ्या महिलेने मुलाच्या विवाहासाठी दोन लाख आणि दागिने जमा केले होते, त्यावर एका महिलेने डल्ला मारला

Taking advantage of the lack of attention, the woman robbed him; on the pretext of shopping, she stole goods worth four and a half lakhs | लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला

लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला

पुणे : वारजे भागातील दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलेने साडेचार लाखांचा ऐवज असलेली पिशवी लंपास केली. ही घटना वारजे माळवाडी येथील अष्टविनायक चौकात घडली.

याबाबत एका ४० वर्षीय महिलेने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वारजे भागातील सहयोगनगर भागात राहायला आहेत. त्यांचे वारजे माळवाडीतील अष्टविनायक चौकात त्यांचे भाजीपाला, मसाले विक्री, तसेच बांगड्याचे दुकान आहे. त्यांच्या मुलाचा विवाह ठरला आहे. घरी दिवसभर कोणी नसल्याने महिला दररोज मुलाच्या विवाहासाठी जमा केलेली दोन लाखांची रक्कम आणि दागिने पिशवीत घेऊन दुकानात यायची. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगा मार्केट यार्डात मसाले खरेदीसाठी गेला. तेव्हा दुकानात गर्दी झाल्याने महिलेने शेजारी भाजी विक्री करणाऱ्या एका तरुणाला मदतीसाठी दुकानात बोलावले. 

सायंकाळी एक महिला दुकानात बांगड्या खरेदीसाठी आली.  बांगड्या पुन्हा ठेवत असताना दुकानदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी तिने साधली. दुकानातील एका जाळीवर ठेवलेली पिशवी घेऊन महिला दुकानातून घाईगडबडीत बाहेर पडली. दुकानदार महिलेला संशय आल्याने तिने जाळीवर ठेवलेली पिशवी पाहिली. तेव्हा पिशवी जागेवर नसल्याचे लक्षात आले. पिशवी घेऊन दुकानातून बाहेर पडलेली महिला तिच्या साथीदारासोबत दुचाकीवरून पसार झाल्याचे उघडकीस आले. घाबरलेल्या महिलेने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुकानातून ऐवज चोरून पसार झालेल्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस हवालदार अर्जुन पवार तपास करत आहेत.

Web Title: Taking advantage of the lack of attention, the woman robbed him; on the pretext of shopping, she stole goods worth four and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.