पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; चंद्रकांत पाटलांच्या महापालिका आयुक्तांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:42 IST2025-05-26T18:42:01+5:302025-05-26T18:42:21+5:30
महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा

पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; चंद्रकांत पाटलांच्या महापालिका आयुक्तांना सूचना
कोथरूड : हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच, पावसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना पाटील यांनी यावेळी दिली.
कोथरुड भागातील पावसाळापूर्व कामांचा आढावा पाटील यांनीं घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. महापालिकेचे इतर अधिकारी यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती पाटील यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच, मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावी. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.