Pune Crime: चारचाकी वाहनाची काच फोडून युवकास भररस्त्यात लुटले, तडीपार आरोपीस अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:36 PM2024-01-18T15:36:19+5:302024-01-18T15:38:22+5:30

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तडीपार गुंडासह दोघांना अटक केली आहे....

Tadipar accused who robbed the youth by breaking the glass of the four-wheeler was arrested | Pune Crime: चारचाकी वाहनाची काच फोडून युवकास भररस्त्यात लुटले, तडीपार आरोपीस अटक 

Pune Crime: चारचाकी वाहनाची काच फोडून युवकास भररस्त्यात लुटले, तडीपार आरोपीस अटक 

लोणी काळभोर (पुणे) : रात्रीचे जेवण उरकून मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या युवकाच्या गाडीची काच फोडून भररस्त्यात लुटल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारमळा परिसरात बुधवारी (दि.१७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तडीपार गुंडासह दोघांना अटक केली आहे. राजेश बाळासाहेब काळभोर (वय-३१, रा. बाजारमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्यात आणखीन दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश काळभोर यांचा वडीलापार्जित शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. दरम्यान, काळभोर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी चारचाकी गाडीतून बुधवारी (दि. १७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निघाले होते. बाजारमळ्याकडून लोणी गावाकडे जात असताना ओढ्याच्या अलीकडे अचानक गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड मारल्याचा आवाज आला. त्यानंतर काळभोर यांनी गाडी थांबविली. त्यांनी गाडीच्या खाली उतरून पहिले असता, बुलेट मोटारसायकलवरती दोघेजण दिसून आले. तसेच त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन आणखी दोघेजण आले.

बुलेट गाडीवर ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे होते. या दोघांनी मिळून राजेश काळभोर यांना पकडले आणि पैसे काढून दे, नाहीतर तुला खल्लास करुन टाकतो, अशी धमकी दिली. काळभोर यांच्या खिशातील ऋषिकेश पवार याने तीन हजार काढून घेतले व त्यांच्या गाडीच्या चारही बाजुच्या काचांवर दगड मारुन त्या फोडल्या. त्यानंतर चौघेजण दोन मोटारसायकलवरुन पळून गेले. या घटनेतील आरोपी तडीपार गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित आरोपी ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अजून दोन अनोळखी आरोपींची नावे समजलेली नाहीत. त्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Tadipar accused who robbed the youth by breaking the glass of the four-wheeler was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.