स्वाइन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

By Admin | Updated: April 16, 2017 04:01 IST2017-04-16T04:01:39+5:302017-04-16T04:01:39+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी शहरात स्वाइन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

Swine Flu Deaths of Two Women | स्वाइन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

स्वाइन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी शहरात स्वाइन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ५५ वर्षीय आणि ३१ वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३५ वर पोहोचली आहे.
हडपसर येथील ५५ वर्षीय महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील स्रावाचे नमुने २३ मार्चला तपासणीसाठी पाठवल्यानंतर दुस-या दिवशी स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. महिलेवर उपचार सुरु असताना १४ एप्रिलला मृत्यू झाला. किरकटवाडी येथील ३१ वर्षीय महिलेला २७ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर २९ मार्चला स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. महिलेमध्ये न्युमोनियाचेही निदान झाले होते. उपचारांदरम्यान १५ एप्रिल रोजी महिलेचा मृत्यू झाला.
शहरात जानेवारी महिन्यापासून २१२ रुग्णांची नोंद झाली असून, ३५ रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी गेला. १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या स्वाईन फ्लूचे ४१ रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील २२ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Swine Flu Deaths of Two Women