पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वारगेट - कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परंतु काम मात्र सुरू झाले नाही. आता महामेट्रोकडून निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला मुहूर्त लागणार असून, येत्या तीन-चार महिन्यांत हे काम सुरू होणार आहे.
महामेट्रोकडून नियोजित स्वारगेट - कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये पद्मावती आणि बिबवेवाडी या दोन स्थानकांचा समावेश नव्हता. यामुळे या परिसरातील नागरिकांनी विराेध केल्यावर पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा दोन स्थानके वाढविण्याची सूचना केली. त्यानंतर आता पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आल्या असून, याला ४० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात आलेल्या निविदांची छाननी केल्यानंतर काम सुरू होणार असून, याला तीन-चार महिने लागणार आहेत. त्यानंतर चार वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, २०२९ मध्ये हे काम पूर्ण होईल.
दोन स्थानकांचा खर्च राज्य सरकार करणार
स्वारगेट - कात्रज या नियोजित मेट्रो मार्गावर सुरुवातीला पद्मावती आणि बिबवेवाडी या दोन स्थानकांचा समावेश नव्हता. नंतर ते दोन स्थानक वाढविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन स्थानकांचे वाढीव खर्च ६८३ कोटी रुपये राज्य सरकार करणार आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार दोन स्थानके वाढविण्यात आले. त्यानंतर आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील दोन - तीन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होईल. - हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो
स्वारगेट - कात्रज मार्ग दृष्टिक्षेप
एकूण अंतर : ५.४६ किमीएकूण खर्च : ३,६४७
वाढीव खर्च : ६८३कामाचा कालावधी : ४ वर्षे
एकूण स्थानके : ५