स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच
By राजू इनामदार | Updated: February 27, 2025 17:08 IST2025-02-27T17:08:01+5:302025-02-27T17:08:58+5:30
राज्यमंत्रीही नाहीत: स्वारगेट बसस्थानकाकडे मंत्र्यांचेच दुर्लक्ष

स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच
पुणे :स्वारगेट बसस्थानकात बलात्कारासारखे गंभीर प्रकरण घडल्यानंतर पुण्यातील बहुतेकांनी त्याची दखल घेत स्वारगेट बसस्थानकाला तत्काळ भेट दिली. मात्र ज्या खात्याकडे याच नव्हे तर राज्यातील सर्वच बसस्थानकांची जबाबदारी आहे ते परिवहन मंत्री व राज्यमंत्री या घटनेनंतर स्थानकाकडे फिरकलेदेखील नाहीत. राज्यमंत्र्यांच्या तर मतदारसंघातच हे स्थानक आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतून प्रतिक्रिया देत स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी आढावा बैठक घेत आहोत असे जाहीर केले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ पूर्वनियोजित दौऱ्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत पुण्याबाहेर होत्या. त्यांनी दुपारी ४ नंतर या घटनेची दखल घेत पोलिस आयुक्तांना फोन केला व तपासाविषयी सांगितले. मात्र, यापेक्षा त्यांनी तत्काळ बसस्थानकात येऊन तेथील दुरवस्थेची पाहणी करणे अपेक्षित होते असे अन्य राजकीय पक्षांच्याच नाही तर त्यांच्याच पक्षातील अनेकांचे मत आहे.
स्वारगेट बसस्थानक शहरातील जुने व मध्यवर्ती बसस्थानक आहे. २४ तासांत तिथून किमान हजार एक गाड्यांची व ५० हजार प्रवाशांची ये-जा होत असते. त्यामुळे स्थानकाच्या व स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानक प्रशासनाची आहे. प्रत्यक्षात मात्र या स्तरावर सगळाच आनंद आहे. स्थानकात मुंबईच्या गाड्या जिथे लागतात, त्याच्या मागे मैदानसदृश स्थानकाचीच रिकामी जागा आहे. तिथे कायम अंधार असतो. स्थानकातील भुरट्या, टपोरी लोकांची ही रात्रीच्या पार्ट्यांची खास जागा आहे.
ही घटना घडल्यावर स्थानकाला भेट देणाऱ्या अनेकांच्या लक्षात ही बाब आली. नादुरुस्त गाड्या तिथेच लावून ठेवलेल्या असतात. या गाड्यांना कुलूप लावून त्या बंद करणे ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक गोष्ट आहे. मात्र बंद पडलेल्या या गाड्या सताड उघड्या असतात. त्यामुळेच या गाड्यांचा काही समाजकंटकांनी बार केला आहे. आत गाद्या लावून ठेवल्या आहेत. तिथे रिकाम्या बाटल्या, बिड्या, सिगारेटची थोटके, रिकामी पाकिटे पडलेली असतात. गुन्हे करणाऱ्यांची ही सोयीची जागा जणू मोकळी करून दिली आहे. इतकी दुर्लक्षित आहे. तिथे ना स्थानक प्रशासन प्रमुखांची फेरी असते, ना सुरक्षा रक्षकांची.
हे सगळे परिवहन मंत्र्यांनी पहायला हवे होते असे प्रवाशांचे मत आहे. सगळे येतात तर मग यांनाच अशी कोणती महत्त्वाची कामे आहेत असा प्रश्न स्थानकांतील अनेक प्रवाशांनी केला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनीही दोघांपैकी कोणीच कसे इकडे येत नाही, त्यांना घटनेचे गांभीर्य नाही का? ते आले असते तर प्रशासनावर वचक येतो, त्यांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.