Swargate Case: कपडे फाटले का? नखांनी ओरबडले का? गाडेच्या आई, बायकोचे भलतेच प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:48 IST2025-03-04T13:46:40+5:302025-03-04T13:48:57+5:30
असे कृत्य केले तरच बलात्कार होतो असे नाही, तर जिवाच्या भीतीने पीडितेने त्याला प्रतिकार केला नसल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली

Swargate Case: कपडे फाटले का? नखांनी ओरबडले का? गाडेच्या आई, बायकोचे भलतेच प्रश्न
पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या घटनेला आज एक आठवडा पूर्ण झाला. स्वारगेट पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून, आरोपी निष्पन्न करून, त्याला अटक करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात वकील आणि कुटुंबियांच्या दाव्याने खळबळ माजली आहे.
वकिलांनी दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा केला होता. तर एका राजकीय व्यक्तीने त्याच दाव्याचे समर्थन करत पुण्याची बदनामी झाल्याचे सांगितले होते. आता मात्र त्याच्या आई आणि बायकोने निरर्थक विधान केले आहे. पीडितेवर खरंच अत्याचार झालाय का याबाबत सवाल उपस्थित केले आहेत.
पीडितेवर अत्याचार झाला नसून संगनमताने हा प्रकार घडल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर आरोपीची आई आणि बायको यांनी देखील कपडे फाटले का?, नखांनी ओरबडले का? असे प्रश्न उपस्थित करून एकप्रकारे आरोपीचे समर्थन केले. मात्र, असे कृत्य केले तरच बलात्कार होतो असे नाही, तर जिवाच्या भीतीने पीडितेने त्याला प्रतिकार केला नसल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली.
आरोपीविरोधात तक्रार असल्यास पुढे यावे...
गाडे विरोधात यापूर्वी जबरी चोरी, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीनेदेखील तपास करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात तक्रार असल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी केले.