नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरला 'लाचलुचपत'ने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:04 IST2021-03-30T21:04:22+5:302021-03-30T21:04:48+5:30
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दाखल होता गुन्हा

नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरला 'लाचलुचपत'ने केली अटक
पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या अमरावती विभागाच्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याला आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दोन वर्षांपूर्वी हनुमंत नाझीरकर याच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणात बारामती पोलिसांकडून नाझीरकर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले.
गेली अनेक महिने हनुमंत नाझीरकर हा पोलिसांना हुलकावणी देत होता. सुमारे १० दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी त्याला महाबळेश्वर येथे पकडले होते. त्याच्याविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात फळविक्रेत्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याला अटक केली. याबाबत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, गेले ८ दिवस हनुमंत नाझीरकर हा पोलीस कोठडीत होता. या काळात त्याच्याकडून अनेक बोगस नोटरी मिळाला आहे. गुन्ह्यातील सबळ पुरावा आम्ही मिळविला आहे. त्याची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला ताब्यात घेतले आहे.
बारामती शहर पोलिसांकडून नाझीरकर याला ताब्यात घेऊन सायंकाळी पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या उघड चौकशीत हनुमंत नाझीरकर याच्याकडे उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. त्यामुळे हनुमंत नाझीरकर (वय ५३), पत्नी संगीता (वय ४५), मुलगी गीतांजली (वय २३) आणि मुलगा भास्कर (वय २३, सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड) यांच्यावर अंलकार पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना नाझीरकर याने नातेवाईकांच्या नावाने आणखी बरीच मालमत्ता खरेदी केली असल्याचे आढळून आले. ती सर्व बेनामी संपत्ती असून ती सुमारे १५० कोटींहून अधिक असल्याचा संशय आहे.
ही मालमत्ता बेनामी असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची माहिती आयकर विभागाला दिली असून त्यांच्याकडून याची चौकशी सुरु आहे.