Suresh Kalmadi Passes Away: पुण्याला राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा नेता हरपला..! शरद पवारांसह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:50 IST2026-01-06T15:48:05+5:302026-01-06T15:50:01+5:30
दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

Suresh Kalmadi Passes Away: पुण्याला राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा नेता हरपला..! शरद पवारांसह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे : राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा आदी सर्व क्षेत्र व्यापून टाकलेले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि. ६) पहाटे निधन झाले. सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळींनी कलमाडी यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका कलमाडी यांनी
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत जपली. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कधी सोडला नाही. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. केंद्रीय मंत्री, ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. आम्ही सर्वजण कलमाडी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. - शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री
माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसंच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ योगदान दिलं. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'पुणे फेस्टिव्हल' आणि 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' सारख्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली. पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. - अजित पवार, उपमुख्यमंत्री
पुण्याचे माजी खासदार आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. हे वृत्त कळताच कोथरूड येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. कलमाडी यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली. बालेवाडी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले. - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री, तसेच पुण्याचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी निभावलेली भूमिका, पुण्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि राजकीय प्रवासातील अनुभव कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. - मुरलीधर माेहाेळ, केंद्रीय मंत्री
पुण्याच्या राजकारणावर दीर्घकाळ ठसा उमटवणारे, पुण्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे सुरेश कलमाडी. राजकारण, क्रीडा, कला आणि संस्कृती यांच्या माध्यमातून पुणेकरांशी नाळ जोडणारा नेता म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहील. - माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, नगरविकास
माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारे ते नेते होते. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. - जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
एकेकाळी पुणे म्हणजे सुरेश कलमाडी आणि सुरेश कलमाडी म्हणजे पुणे असे समीकरण होते. पुण्याचे कारभारी म्हणून ते पुणेकरांच्या मनात दीर्घकाळ राहिले. तसेच केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी देशभरात पुण्याचे नेतृत्व केले. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे. राजकारणातून अलिप्त झाले, पण स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय उड्या मारल्या नाहीत. त्यांच्या जाण्याने पुण्यातील राजकारणाचा एक अध्याय थांबला आहे. - बाळा नांदगावकर, मनसे