Suresh Kalmadi Passes Away : सुरेश कलमाडी : हवाई दलाचा अनुभवसिद्ध राजकीय नेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:10 IST2026-01-06T20:07:45+5:302026-01-06T20:10:02+5:30
सुरेश कलमाडी आधी हवाईदल अधिकारी होते व नंतर राजकारणी. ते राजकारणात आल्यानंतरही सैनिकात असतो तो लढाऊपणा त्यांच्यात कायम होता.

Suresh Kalmadi Passes Away : सुरेश कलमाडी : हवाई दलाचा अनुभवसिद्ध राजकीय नेता
पुणे - राजकीय नेता म्हणून ओळख असलेले सुरेश कलमाडी यांची स्क्वॉर्डन लीडर म्हणून असलेली हवाई दलातील कामगिरीही उल्लेखनीय होती. त्याविषयी सांगत आहेत निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले.
हवाई दलाचा अनुभवसिद्ध राजकीय नेता
सुरेश कलमाडी आधी हवाईदल अधिकारी होते व नंतर राजकारणी. ते राजकारणात आल्यानंतरही सैनिकात असतो तो लढाऊपणा त्यांच्यात कायम होता. त्यातही हवाई दलातील सैनिक फार नियोजनपूर्वक व गंभीरपणे आपली कामगिरी पार पाडण्यासाठी प्रसिद्ध असतात. हे नियोजन त्यांच्या ब्लडमध्ये होते असे मला वाटते. कारण राजकीय नेता म्हणून त्यांनी पुढे अनेक मोठे उपक्रम राबवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यात त्यांचे हे नियोजनबद्ध काम करणे उठून दिसत होते.
माझा त्यांचा हवाई दलात थेट संबंध आला नाही, ते मला बरेच सीनियर होते. मात्र, त्यांच्याविषयी नंतरही हवाई दलात बरेच ऐकायला मिळाले. विशेषत: १९७१ च्या युद्धात त्यांना एअर फोर्सच्या सप्लाय विभागात केलेल्या कामगिरीविषयी. ती कामगिरी बेस्ट कामगिरी होती असे बोलले जायचे. मलाही ते ऐकायला मिळाले.
सन १९६४ मध्ये त्यांना एअरफोर्समध्ये कमिशन मिळाले. नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे ते पास आऊट होते. त्यांच्या तुकडीत ते सहावे आले होते. प्रशिक्षणानंतर ते एअर फोर्सच्या आग्रा येथील विभागात नियुक्त झाले. ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट विभागात त्यांची नियुक्ती होती. एक उत्कृष्ट पायलट म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. अशी विमाने किंवा हेलिकॉप्टर्स चालवण्यासाठी विशेष प्रकारचे कौशल्य लागते. ते त्यांनी आत्मसात केले होते.
सन १९७१च्या युद्धात त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. सप्लाय विभागात ते होते. सैनिकांना लागणारे साहित्य विमानाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची ही कामगिरी होती. ती त्यांनी पार पाडली. हे काम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केले असे सांगितले जाते. खरोखरच अशा कामामध्ये कौशल्य लागतेच, ते त्यांच्याकडे होते.
या युद्धानंतर ते प्रशिक्षक म्हणून एनडीएमध्ये आले. दोन वर्षे त्यांनी तेही काम अतिशय चांगले केले. त्याविषयीही अजून बोलले जाते. १९७४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यानंतरचा त्यांचा पुढचा राजकीय इतिहास आपल्याला माहिती आहे. तिथेही त्यांनी चांगली कामगिरी केली. मात्र, मला कायम असेच वाटत आले की, ते आधी हवाईदलाचे सैनिक होते व त्यानंतर राजकीय नेता. - भूषण गोखले (लेखक निवृत्त एअर चीफ मार्शल आहेत.)