Suresh Kalmadi Passes Away: स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणणारा राजकारणी..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 22:25 IST2026-01-06T22:24:33+5:302026-01-06T22:25:02+5:30
- प्रचंड जिद्दी, आक्रमक, झंझावाती, एकदा एखादी गोष्ट ठरवली की काहीही झाले तरी ती करणारच अशा स्वभावाचे होते सुरेश कलमाडी.

Suresh Kalmadi Passes Away: स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणणारा राजकारणी..!
पुणे - कलमाडी म्हणजे एक झंझावात. काहीतरी अचाट ठरवणार आणि सहकाऱ्यांच्या मदतीने ते साकारही करणार. त्यासाठीची जिद्द त्यांना बहुदा हवाई दलातील प्रशिक्षणातून मिळाली असावी.
स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणणारा राजकारणी
प्रचंड जिद्दी, आक्रमक, झंझावाती, एकदा एखादी गोष्ट ठरवली की काहीही झाले तरी ती करणारच अशा स्वभावाचे होते सुरेश कलमाडी. सैन्यदलातील लोकांमध्ये असतात ती सर्व वैशिष्ट्ये त्यांच्यात होती. कोणाला फारशी कल्पना नाही, मात्र त्यांच्या राजकारणाची सुरुवातच माझ्या नेतृत्वाखाली झाली. मी प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना त्यांना पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष केले होते. त्या पदावरून त्यांनी असे काही काम केले की ते अल्पावधीतच ते थेट दिल्लीत राज्यसभेचा खासदार म्हणून पोहोचले.
हवाई दलातून काँग्रेसमध्ये
साधारण १९७४ मध्ये त्यांनी हवाई दलातून निवृत्ती घेतली. १९७५ला पुण्यात आले. त्यावेळचे पूना कॉफी हाउस त्यांनी घेतले. सामाजिक, राजकीय जीवनाची त्यांना प्रचंड हौस. वेगवेगळ्या गावांमधून पुणे शहरात शिक्षणासाठी आलेली मुले वसतिगृहात राहायची. त्यांच्याबरोबर संपर्क ठेवण्यासाठी मी तिथे जायचो. त्यावेळी मला कलमाडी तिथे भेटले. ‘मला काँग्रेसचे काम करायचे आहे’ असे त्यांनी सांगितले. तशी सुरुवातही झाली. संजय गांधी यांनी एक ५ कलमी कार्यक्रम दिला होता. त्यात कलमाडी यांनी पुणे शहरात बरेच चांगले काम केले.
पुणे युवक काँग्रेस अध्यक्ष
पुढे १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पुणे दौऱ्यावर आले होते. युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही टिळक स्मारक मंदिरासमोर त्यांची गाडी अडवली. मोठे आंदोलन झाले. त्याच्या बातम्या इंग्रजी पेपरमध्ये आल्या. संजय गांधी यांच्या वाचनात त्या आल्या. त्यांनी आंदोलनाची माहिती घेतली. दरम्यान, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी सुरेश कलमाडी यांची निवड केली. त्यांनी युवक काँग्रेसच्या पुणे शहरातील कामाला गती दिली. चांगले संघटन उभे केले. १९७९ मध्ये त्यांना विधानसभेचे शिवाजीनगर मतदारसंघाचे तिकीट दिले. त्यात ते पराभूत झाले.
पराभवानंतर खचले नाहीत
पराभूत झाले तरीही राजकारणात मात्र त्यांनी जी गती पकडली ती पुढे कधीच सोडली नाही. १९८०ला त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तो त्यांचा स्वभावही नव्हता. दिल्लीत गेल्यानंतर साहजिकच त्यांचे राजकीय वर्तुळ वाढले. पुणे शहरावर तर त्यांनी वर्चस्व मिळवलेच; पण दिल्लीतही स्वत:ची अशी खास जागा तयार केली. पुणे शहराला जगाच्या नकाशावर नेण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे व ते कोणालाही नाकारता येणार नाही. सलग दोन-तीन वेळा त्यांनी पुणे महापालिकेवर वर्चस्व मिळवले.
स्वप्न साकार करणारच
भव्यदिव्य स्वप्न पहायचे व ते साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे हा त्यांचा खरा स्वभाव होता. आज आपण मेट्रोने प्रवास करतो आहोत, मात्र पुण्यात मेट्रो हवी हे स्वप्न सर्वप्रथम कलमाडी यांनी पाहिले हे विसरतो. पुणे फेस्टिव्हल, पुणे मॅरेथॉन, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ही सगळी स्वप्न त्यांनी पाहिली व प्रत्यक्षात उतरवली. त्यासाठी आपली सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक ताकद पणाला लावली. एक सैनिकच हे करू शकतो. राजकारणात पुढे त्यांची पीछेहाट झाली, मात्र तो वेगळा विषय आहे. स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणणारा राजकारणी हेच त्यांचे चपखल वर्णन आहे, असे मला वाटते. - उल्हास पवार ( लेखक माजी आमदार, ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत.)