सासवड : पुरंदर आंतराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पाविरोधात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यामध्ये आंदोलन करून घरी जात असताना कुंभारवळणमधील एका महिलेचा मृत्यू देखील झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ६) खासदार सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळणमधील त्या महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान मिळावे म्हणून रात्रंदिवस प्रचार केला, मात्र एवढा मोठा प्रकार होऊनही तुमचा एकही पदाधिकारी साधा फिरकला देखील नाही. सुप्रिया ताई, तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांच्या, असे म्हणत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी सुप्रिया सुळे यांना एकाही प्रश्नाला उत्तर देता आले नाही.
वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर म्हणाले, आम्ही तीन दिवस उपोषण केले, पुण्याला मोर्चा नेला, आमच्यावर लाठीहल्ला होऊन कित्येक शेतकरी जखमी झाले, संपूर्ण राज्याने दखल घेतली. मात्र तुमच्यासाठी दिवसरात्र प्रचार केला आणि तुमच्या सहित राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने साधी दखल घेतली नाही. त्यामुळे आमचे चुकले का, असा जहरी प्रश्न उपस्थित करताच त्यांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना घाम फुटला होता.
कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड म्हणाल्या, आमची पाच मुले अटक आहेत. त्यांच्यावरील गुन्हे माघारी घ्यावेत, अशी मागणी करतानाच पशुधन वाचविण्यासाठी आंदोलन करीत असताना तो आमचा गुन्हा आहे का? तुम्ही निवडून येण्यासाठी आम्ही ठराव करून मतदान केले, आम्हाला कोणताही मोबदला नको आहे. मग आमच्यावर विमानतळ का लादत आहे? विकास म्हणजे केवळ विमानतळ नाही, त्यापेक्षा २४ तास वीज द्या, १९७२ मधील दुष्काळात शेतकरी जमीन सोडून गेले नाही मग आता का सोडून जायचे, असा सवाल उपस्थित केला.
प्रश्नांच्या भडीमारानंतर खासदार सुळे म्हणाल्या, माझ्या प्रत्येक भाषणात पुरंदरच्या शेतकऱ्यांना विमानतळाला विरोध नाही तर जागेला विरोध आहे. जिथे जागा असेल तिथे विमानतळ करा, असे म्हणाले आहे. या जागेवर करा, असे कधीही म्हणाले नाही. मी कोणत्याही विकासकामाला विरोध केला नाही आणि तुमची इच्छा नसेल तर करू नका. आपल्याला शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचे आहेत. तुमच्यासाठी कोणाच्याही दारात यायला तयार आहे.
पुरंदरमध्ये माझी एक इंचही जमीन नाही
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व ऊदाचीवाडी गावचे रहिवासी संतोष हगवणे यांनी सुप्रिया सुळे यांना आमच्या गावात तुमची १२० एकर जमीन असल्याचा गंभीर आरोप केला. " ताई तुम्ही पुरंदरला आल्यावर एक बोलता आणि मुंबई, दिल्लीमध्ये वेगळे बोलता. मग तुम्ही विमानतळाच्या की शेतकऱ्यांच्या बाजूने, असा प्रश्न उपस्थित करून अक्षरशः गोंधळ उडवून दिला. यावर बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी माझी अथवा आमच्या परिवाराची पुरंदर तालुक्यात एक इंचही जमीन नसल्याचे सांगितले. कोठे सातबारा असेल तर मला दाखवा, आपण निम्मी निम्मी वाटून घेऊ, असे खुले आव्हान दिले. तसेच चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.