आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:06 IST2025-09-25T19:06:16+5:302025-09-25T19:06:38+5:30
राज्यात १०० पेक्षा अधिक मोर्चे काढले, पण अजित पवारांच्या सांगण्यावरुन बारामती आणि गेवराई या २ ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले.

आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप
बारामती: सप्टेंबर रोजी बारामती मध्ये ओबीसी आंदोलन मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह १४ आंदोलकांनी भाषणे केली. यासाठी पोलिसांनी पूर्व परवानगी नाकारली. तरीही मोर्चा काढला म्हणून १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी (दि २५) प्रा. हाके यांच्यासह १४ आंदोलक बारामती शहर पोलीस ठाण्यात पोहचले.यावेळी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्यांच्या कक्षात बोलावत त्यांना नोटीस दिल्या.त्यानंतर हाके बाहेर पडले.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही राज्यात १०० पेक्षा अधिक मोर्चे काढले. मात्र त्यापैकी फक्त बारामती आणि गेवराई या दोनच ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांच्याच सांगण्यावरुन आमच्यावर गुन्हे दाखल झाले. शांततेच्या मार्गाने संविधानाची भाषा बोलून देखील हे गुन्हे दाखल झाले. आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवार यांना मतदान केले. त्यांनीच आमचे आरक्षण संपविल्याचा आरोप प्रा.लक्ष्मण हाके यांनी केला.
प्रा.हाके आंदोलकांसह पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर आंदोलक आणि पोलीस अधिकाऱ्यांची बाचाबाची झाली. जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही. मात्र आम्ही संविधान सोडून काहीच केले नाही. तरीही आमच्यावर गुन्हा दाखल करता,असा सवाल प्रा.हाके यांनी पोलीसांना केला. आंदोलनाला परवानगी नसतानाही आपण आंदोलन केले. त्यामुळे या नोटीसा देत आहोत असे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आम्हाला आत्ता अटक करा. आम्हाला जामीन ही घ्यायचा नसल्याची भुमिका घेतली.त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान आंदोलकांची समजूत पोलीस निरीक्षक नाळे यांनी काढली त्यांना नोटीसा देण्यात आल्या नोटीसीवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या.त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले.
पोलीस ठाण्यात पोहचल्यावर चर्चा सुरू असताना काही आंदोलक हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरुन दाखल झाल्याचा आरोप केला. तर याच १४ आंदोलकांमधील काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र अजित पवारांची बदनामी होत असल्याचे सांगत, अजित पवारांचा याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले.