'इतका प्रामाणिकपणा क्वचितच दिसतो', मुख्यमंत्र्यांनी केला कचरा वेचक अंजू मानेंचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:19 IST2025-12-04T13:18:19+5:302025-12-04T13:19:14+5:30
अंजू माने यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडी आणि ५१ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले

'इतका प्रामाणिकपणा क्वचितच दिसतो', मुख्यमंत्र्यांनी केला कचरा वेचक अंजू मानेंचा सत्कार
पुणे : प्रामाणिकपणा हा गुण दुर्मीळ झाल्याच्या काळात कचऱ्यात सापडलेली दहा लाख रुपयांची पिशवी मूळ मालकाला परत करणे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. इतका प्रामाणिकपणा आता क्वचितच दिसतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वच्छ’च्या स्वयंसेविका अंजू माने यांचा गौरव केला.
'स्वच्छ' या कचरा वेचक स्वयंसेवकांच्या संस्थेमार्फत अंजूताई माने या कसबा पेठ विधानसभेत येणाऱ्या परिसरात कचरा संकलनाचे काम करतात. काही दिवसांपूर्वी काम करताना त्यांना तब्बल दहा लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी सापडली. छोट्या छोट्या गोष्टींचाही मोह पडण्याच्या सध्याच्या काळात त्यांनी मात्र मूळ मालकाचा शोध घेत पैशाची पिशवी त्यांच्या स्वाधीन केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आमदार हेमंत रासने यांनी मुलीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंजू माने यांचा सत्कार केला. यावेळी माने यांना साडी आणि ५१ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
नेमकं काय घडलं?
पुण्याच्या सदाशिव पेठेत कचरावेचक अंजू माने या रोज ठरलेल्या वेळेप्रमाणे कचरा गोळा करत होत्या. त्यावेळी त्यांना १० लाखांची रोख रक्कम असलेली बॅग सापडली. एवढी मोठी रक्कम बघून त्यांना कसलाही मोह झाला नाही. यावेळी माने यांनी बॅगचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो माणूस त्यांना भेटला. तो प्रचंड अस्वस्थ होता. अंजू माने यांनी त्याला आधी पिण्यासाठी पाणी दिले. मग त्याची पैशाची बॅग समोर ठेवली. त्यांनी बॅगेतील एक पैशाला हात न लावता ती बॅग प्रामाणिकपणे संबंधिताला परत केली. त्यावेळी त्या माणसाच्या जीवात जीव आला. त्याने अंजु यांचे आभारही मानले. १० लाखांचा मोह अंजू यांना झाला असता तर पुढे त्यांनी ही गोष्ट कोणालाही कळून दिली नसती. त्या पैशाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले असते. पण त्यांनी कसलाही नकारात्मक विचार न करता बॅगच्या मालकाला शोधण्यास सुरुवात केली. तो भेटल्यावर त्याच टेन्शन दूर करण्यासाठी त्याला पाणी दिले. त्यानंतर त्याची बॅग परत केली. यावरून जगात अजूनही माणुसकी कुठंतरी शिल्लक असल्याचे दिसून येते. अंजु यांनी केलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.