गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा;उच्च न्यायालयाचे महापालिका आयुक्तांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:04 IST2024-12-18T11:04:23+5:302024-12-18T11:04:23+5:30
उच्च न्यायालयाचे पुणे महापालिका आयुक्तांनी ७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले

गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा;उच्च न्यायालयाचे महापालिका आयुक्तांना आदेश
पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील आनंदऋषीजी चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलासाठी गणेशखिंड रस्ता ३६ मीटरवरून ४५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यावरील झाडे तोडण्यात येणार आहेत. याविरोधात परिसर या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर पुणे महापालिका आयुक्तांनी ७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा आदेश दिला. उच्च न्यायालयाने १७ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी काय पावले उचलली याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र पुणे महापालिका आयुक्तांनी स्वत: किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दाखल करावे. त्यामध्ये यापूर्वी दिलेल्या आदेशाच्या परिच्छेद पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे समितीने केलेल्या शिफारशींचे पालन करण्यासाठी कोणती पावले उचलली, याचा तपशील द्यावा. या प्रतिज्ञापत्राची महापालिका आयुक्त स्वत: पडताळणी करतील. तसेच न्यायालयाच्या आदेश पालनात त्रुटी असल्यास त्याची दखल गांभीर्याने घेतली जाईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणी परिसर संस्थेने पुणे महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या ७२ झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाने ही झाडे काढण्यास परवानगी दिली. मात्र, महापालिकेने या निर्देशांचे पालन केले नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पथ विभागाचे अभियंता, वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे.