विद्यार्थ्यांनी वसतिगृह न मिळाल्याने धरला घरचा रस्ता; पुणे विद्यापीठ नेमकेे कुणासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:46 IST2022-11-24T18:45:59+5:302022-11-24T18:46:50+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागाच्या प्रवेशित अनेक विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह मिळालेले नाहीत

विद्यार्थ्यांनी वसतिगृह न मिळाल्याने धरला घरचा रस्ता; पुणे विद्यापीठ नेमकेे कुणासाठी?
कमलाकर शेटे
पुणे : बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट. त्यामुळे आर्थिक ताण येणार नाही, अशाच ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेतात. जेणेकरून नाममात्र शुल्कात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मात्र शुल्कवाढ केली. वेळेत वसतिगृहदेखील उपलब्ध केले नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी आलेच नाहीत, जे आले ते वसतिगृह न मिळाल्याने घरचा रस्ता धरल्याचे चित्र दिसत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागाच्या प्रवेशित अनेक विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह मिळालेले नाहीत. त्यातच वसतिगृह प्रशासनाने प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक मशीन बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना, त्यात काही मुलींनासुद्धा साहित्य घेऊन बाहेर पडावे लागले आहे. विद्यापीठात प्रवेश असूनही वसतिगृहात प्रवेश मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठातून बाहेर पडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. परराज्यातील काही विद्यार्थी वसतिगृह मिळाले नसल्याने घरी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राहायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
अजूनही वसतिगृह मिळाले नाही
आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे बाहेर ठिकाणी राहून शिक्षण घेणे शक्य नाही. सध्या आमची परीक्षा जवळ आली आहे. आम्ही काही दिवस बाहेर राहिलो. अजूनही वसतिगृह मिळाले नाही. त्यामुळे आम्ही गावी आलो आहोत. - विद्यार्थिनी, गोवा
अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन केले जाणार
सर्व विद्यार्थी व कृती समितीच्या वतीने बुधवारी कुलसचिवांना निवेदन दिले. विद्यापीठ प्रशासनाने गरजू विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह द्यावे; अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन केले जाणार आहे. - राहुल ससाणे, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलांचे सहा क्रमांकाचे बंद असलेले वसतिगृह सुरू केले आहे, त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थी संघटनांनी बंद वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. याबाबत प्रसारमाध्यमांनीसुद्धा प्रसिद्धी दिली होती. - डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ