विद्यार्थिनीची छेडछाड, तरुणाला जाब विचारले असता पालकांनाही मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:15 IST2025-07-29T15:14:05+5:302025-07-29T15:15:21+5:30
तुझ्या मुलीसाठी काय आम्ही २४ तास ड्युटी करायची का, अशा शब्दांमध्ये पोलिसांनी पालकांशी अरेरावीची भाषा केली

विद्यार्थिनीची छेडछाड, तरुणाला जाब विचारले असता पालकांनाही मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ
पुणे/पानशेत: पानशेत येथे तीन तरुणांनी विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानंतर पालकांनी संबंधित तरुणाला त्यासंदर्भात विचारले असता त्याच दिवशी दुपारी पीडितेच्या घरात घुसून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्या दिवसापासून ते आजपर्यंत पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत आहे.
पानशेत येथील शाळेमध्ये तेथून जवळपास असलेल्या गावातून एक विद्यार्थिनी शिकत आहे. २१ जुलैला त्या विद्यार्थिनीची तेथील तीन तरुणांनी छेड काढली. घाबरून घरी परतलेल्या मुलीने झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या चुलत्याला दिली. छेडछाड करणारे तरुण हे गावातीलच असल्यामुळे तिच्या चुलत्याने त्यांना फोनवरून जाब विचारला. या प्रकाराचा राग मनात धरून वरील तिन्ही तरुणांनी आणखी सुमारे २० ते २५ जणांना सोबत घेऊन पीडितेच्या घरी दुपारीच धाड टाकली. लाकडी दांडक्यांनी घरातील लोकांवर मारहाण केली आणि घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना घडल्यानंतर पीडित परिवाराने पानशेत येथील स्थानिक पोलिस चौकीत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान, हे कुटुंब तक्रार देण्यासाठी वेल्हे पोलिस ठाण्यात गेले. तेथेही या कुटुंबाची दखल घेतली गेली नाही. याउलट तक्रारदाराला घाबरवण्याचा प्रकार घडला आहे. आम्ही दाद मागायची तरी कुठे? असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अरेरावीची भाषा
छेडछाडीची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेलो असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याउलट त्या तरुणांनी बाजू घेतली. उद्या आमच्या मुलीचे बरेवाईट झाले तर काय करायचे, असे सांगितले तर पोलिस म्हणतात, तुझ्या मुलीसाठी काय आम्ही २४ तास ड्युटी करायची का, अशा शब्दांमध्ये अरेरावी केली. सहा-सात दिवस गेले तरी तक्रार दाखल करून घेत नाही. माझ्या भावाला मारहाण केली त्याला नीट चालताही येत नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.
पानशेतला छेडछाडीचा काही प्रकार घडलेला नाही. तो भांडणाचा प्रकार घडला असून, तो अदखलपात्र गुन्हा म्हणून दाखल केला आहे. तसं काही असेल तर संबंधितांनी तक्रार द्यावी, असे त्यांना सांगितले आहे.- नितीन खामगळ, सपोनि. वेल्हे पोलिस ठाणे