गुन्हा मागे घेण्यासाठी निरगुडसर येथून विद्यार्थ्याचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 14:05 IST2024-12-14T13:50:20+5:302024-12-14T14:05:05+5:30
अपहरण झालेल्या आर्यनचे वडील विक्रम गोरक्षनाथ चव्हाण (रा. निरगुडसर) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा मागे घेण्यासाठी निरगुडसर येथून विद्यार्थ्याचे अपहरण
निरगुडसर : संगमनेर पोलिस ठाण्यात तरुणाच्या विरोधात आईने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी बारा वर्षीय मुलाचे शाळेच्या मैदानातून अपहरण करण्यात आले. आर्यन विक्रम चव्हाण (वय १२) असे त्याचे नाव आहे. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे घडली. याप्रकरणी राजू जंबूकर (वय २६, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर पारगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या आर्यनचे वडील विक्रम गोरक्षनाथ चव्हाण (रा. निरगुडसर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी अर्चना हिने एका प्रकरणात जंबूकर याच्याविरोधात संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी जंबूकरने माझा मुलगा आर्यनचे तो शिक्षण घेत असलेल्या निरगुडसर गावच्या हद्दीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातून बुधवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजता आमिष दाखवून पळवून नेले. आर्यन हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. त्याला शाळेतून पळवून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अपहरण झालेल्या आर्यन चव्हाणचे वर्णन पुढीलप्रमाणे :- वय १२, बांधा सडपातळ, रंगाने गोरा, उंची ४ फूट, केस लहान, काळे, अंगात शाळेचा युनिफॉर्म, निळ्या रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा व त्यावर निळ्या रंगाच्या चौकटी असलेला हाफ बाह्यांचा शर्ट, पायात सॅन्डल, शिक्षण ५ वी, मराठी भाषा बोलतो. जंबूकर याच्यावर संगमनेर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मागावर पारगाव पोलिस आणि एलसीबीची पथके आहेत. लवकरच त्याला अटक केले जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी सांगितले.