बारामतीत ‘एआय’निर्मित बिबट्या दिसल्याची जोरदार अफवा; वनविभागाने केले खंडन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 20:27 IST2025-11-28T20:27:18+5:302025-11-28T20:27:53+5:30
ऊसाच्या शेतात बिबट्या दिसल्याचे व्हायरल झाल्यावर वनविभागाने चौकशी केली असता ‘एआय’निर्मित असल्याचे निष्पन्न झाले

बारामतीत ‘एआय’निर्मित बिबट्या दिसल्याची जोरदार अफवा; वनविभागाने केले खंडन
बारामती : गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या ‘एआय’निर्मित व्हायरल छायाचित्रांनी बारामतीकरांच्या जीवाला घोर लावला आहे. शहरात बिबट्या दिसल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होताच काहींनी अफवा पसरविली. मात्र, वनविभागाने सावधगिरीने पाहणी केली. पाहणीनंतर शहरात बिबट्या असल्याचे कोणतेही चिन्ह आढळले नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
गुरुवारी (दि. २७) सायंकाळी कसबा भागातील शिंदे पार्क परिसरात उसाच्या शेतात बिबट्या दिसल्याचे छायाचित्र सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले. त्यानंतर परिसरातील स्थानिकांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्याअनुषंगाने वनविभागाच्या टीम आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे बिबट्याची कोणतीही पायनिशाणी (पाऊलखुणा) आढळली नाहीत. यामध्ये व्हायरल झालेल्या छायाचित्राची पडताळणी केल्यानंतर ते ‘एआय’द्वारे निर्मित असल्याचे निष्पन्न झाले. तसेच शुक्रवारी (दि. २८) शहरातील रिंगरोडवर माजी नगरसेवक आबा बनकर यांच्या बंगल्याशेजारी बिबट्या आढळल्याचे छायाचित्र पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पुन्हा पाहणी केली. तिथेही बिबट्याचे कोणतेही पुरावे (पाऊलखुणा) सापडले नाहीत. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या. व्हायरल झालेल्या या छायाचित्राचीही पडताळणी केल्यावर ते ‘एआय’निर्मित बनावट छायाचित्र असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे वनविभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अफवा पसरवू नयेत आणि बनावट छायाचित्रे सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नयेत, असे वन अधिकारी दीपाली शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, बारामतीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या निरावागज गावात काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे आढळले आहे. तिथे बिबट्यामुळे शेळी व कुत्र्यांचा फडशा पडला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने मंगळवारी (दि. २५) तिथे पिंजरा लावला आहे. बिबट्या जवळ असल्यास ओरडत हळूवार मागे सरकावे; बिबट्या दूर असल्यास शांतपणे हात वर करून मागे दुरावा आणि त्याला पळून जाण्याचा मार्ग द्यावा. घाबरू नका, धावत सुटू नका किंवा पाठ फिरवू नका. शाळेत जाताना किंवा येताना ऊसशेती व बागायती शेतीजवळील रस्ते वापरताना समूहात जावे, आवाज करत वा मोठ्या व्यक्तीसोबतच जावे. घराला किंवा पाळीव प्राण्यांच्या गोठ्याला १५ फूट उंच जाळी असलेले बंदिस्त कंपाउंड करावे, शौचालयाचा वापर करावा व उघड्यावर शौचास जाणे टाळावे. वनविभागाची हेल्पलाइन नंबर १९२६ वर संपर्क साधावा, असे वनविभागाने नागरिकांना सांगितले आहे.