सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला ताण, थकवा हे मुख्य कारण; शरद पवारांना पुढील २ दिवसांत डिस्चार्ज देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:32 IST2026-02-11T12:28:55+5:302026-02-11T12:32:06+5:30
अलीकडील व्यापक दौरे, प्रवास आणि वारंवार होणाऱ्या सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला शारीरिक ताण व थकवा हे या त्रासाचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला ताण, थकवा हे मुख्य कारण; शरद पवारांना पुढील २ दिवसांत डिस्चार्ज देणार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात सातत्याने सुधारणा होत आहे. त्यांचे सर्व जीवनावश्यक घटक (वायटल पॅरामीटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण क्लिनिकल स्थिती स्थिर आणि दिलासादायक असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली आहे.
रुग्णालयात दाखल होताना आढळलेली छातीतील कोंजेशन (कफ साचणे) उपचारांना अत्यंत चांगला प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुरळीत सुधारणा होत आहे. अलीकडील व्यापक दौरे, प्रवास आणि वारंवार होणाऱ्या सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला शारीरिक ताण व थकवा हे या त्रासाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वैद्यकीय देखरेखीखाली पवार यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. सध्याच्या प्रगतीचा आढावा घेत, पुढील दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचे नियोजन वैद्यकीय पथकाकडून करण्यात येत आहे, अंतिम निर्णय त्यांच्या प्रकृतीतील सातत्यपूर्ण सुधारणा लक्षात घेऊन घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याच्या कारणास्तव सोमवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी रुबीचे संचालक डॉ. सायमन ग्रॅण्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत काही चाचण्या सामान्य असल्याचे निदर्शनास आले असून, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.