वादळी पावसाचा पिकांना फटका

By Admin | Updated: June 9, 2015 05:13 IST2015-06-09T05:13:30+5:302015-06-09T05:13:30+5:30

खेड तालुक्यात रविवारी पूर्वपट्ट्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

Stormy rains hit the crop | वादळी पावसाचा पिकांना फटका

वादळी पावसाचा पिकांना फटका

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यात रविवारी पूर्वपट्ट्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. विजेसह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील शेतात उभ्या असलेल्या कांदापिकाला त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे. काही गावांमध्ये हलका, तर काही परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शेतातील काढणी केलेला कांदा पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी त्रेधा उडाली.
खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पावसास सुरुवात झाली. यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे, तसेच जनावरांच्या चारा पिकाचे नुकसान झाले. तोडणीला आलेल्या फुलशेतीचेही नुकसान झाले. काढणीला आलेल्या पालेभाज्या पावसाच्या सरींमुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. आज सकाळपासूनच वातावरणात कमालीची उष्णता जाणवत होती. सायंकाळी सातच्या दरम्यान सुसाट वेगाने वारा वाहू लागल्याने पावसाचे बळ निर्माण होऊन विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरुवात झाली.

Web Title: Stormy rains hit the crop