रस्त्यावर थुंकणे थांबवा...! पिचकारी मारली अन् पोलिसांनी सर्वांसमोर ती काढायला लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:31 IST2023-01-13T12:31:36+5:302023-01-13T12:31:53+5:30
पिचकारी बहाद्दरांकडून थुंकलेली जागा त्यांच्याकडून साफ करण्यात येत असून त्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे

रस्त्यावर थुंकणे थांबवा...! पिचकारी मारली अन् पोलिसांनी सर्वांसमोर ती काढायला लावली
कात्रज : रस्त्यावर थुंकणाऱ्या पिचकारी बहाद्दरांवर पोलिसांनी आता कारवाईचे शस्त्र उपसले आहे. त्यांनी थुंकलेली जागा त्यांच्याकडून साफ करण्यात येत असून त्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे पिचकारी बहाद्दरांनो आता रस्त्यावर पिचकारी मारणे तुम्हाला चांगलेच अडचणीत आणणार आहे, याचे भान राखा. कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, दत्तनगर ते पंचमी हॉटेलपर्यंत असणाऱ्या रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर आरोग्य निरीक्षकांची पथके तयार करून विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एकूण १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या नियंत्रणाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशीच कारवाई चालू राहणार असल्याने नागरिकांनी रस्त्यावर थुंकून घाण करू नये अन्यथा ती पुसून त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड घेण्यात येईल दंड न भरल्यास कोर्टात खटला दाखल करणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांकडून सांगण्यात आले. तसेच धूम्रपान करणाऱ्यांनी व गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचे देखील आवाहन सहायक आयुक्त धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून करण्यात आले.