दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवा, अन्यथा कारवाई; पुणे महापालिका अन् पुणे पोलिसांमध्येच जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:13 IST2025-10-14T11:12:46+5:302025-10-14T11:13:16+5:30
ठेकेदाराला महापालिकेने कडक शब्दांत समज देत दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवण्याचे आदेश दिले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे

दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवा, अन्यथा कारवाई; पुणे महापालिका अन् पुणे पोलिसांमध्येच जुंपली
पुणे : महापालिकेची परवानगी नसताना पोलिसांच्या सीसीटीव्ही केबलसाठी खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने कडक शब्दांत समज देत दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
महापालिकेकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांना सशुल्क परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून खोदाईसाठी १ ऑक्टोबर ते ३० एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर पुढील एक मे रोजी खोदाई बंद करून ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त केले जातात. पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे व साचणारे पाणी यामुळे वाहतूक मंदावते. त्यामुळे पावसाळ्यात केवळ अति महत्त्वाच्या, तातडीची निकड अशा कामासाठीच खोदाईची परवानगी दिली जाते. मात्र, पोलिस प्रशासनाने महापालिकेच्या पथ विभागाने परवानगी देण्यापूर्वीच सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी ठेकेदारामार्फत खोदाई सुरू केली. त्यामुळे पथ विभागाने नाइलाजाने पोलिसांना पावसाळ्यात खोदाईला परवानगी दिली. ही परवानगी केवळ पेठांपुरतीच मर्यादित होती. मात्र, पोलिसांनी नंतर शहरात खोदाई सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी वाहतुकीसंदर्भात घेतलेल्या बैठकीत परवानगी नसलेल्या परिसरात सीसीटीव्ही केबलसाठी सुरू असलेली खोदाई थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते. तसेच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरात परवानगी नसलेल्या ठिकाणी खोदाई सुरूच होती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला खोदाई करण्यासाठी महापालिकेने दिलेली परवानगी आणि ठेकेदाराने प्रत्यक्षात खोदलेले रस्ते याचे पुरावेच पोलिस आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत सादर केले. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित ठेकेदाराला सुनावत यापुढील काळात महापालिकेकडून तक्रार येऊ न देण्याची समज दिली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला समजपत्र दिल्याचे पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
महापालिकेने रस्ते खोदाई केवळ पेठांच्या परिसरापुरती मर्यादित असताना इतर भागात खोदाई करण्यात आली. दररोज ठराविक मीटर रस्ते खोदणे अपेक्षित असताना किलोमीटर अंतराची खोदाई ठेकेदाराने केली. त्यामुळे महापालिकेने कडक शब्दात ठेकेदाराला पत्र पाठविले आहे. पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. -अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, महापालिका.