कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:27 IST2025-05-07T15:26:08+5:302025-05-07T15:27:01+5:30
लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला

कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना
नारायणगाव : जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात असलेल्या खडकुंबे गावातील लग्नसोहळ्यात आग्या मोहळातील मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १९ वऱ्हाडी जखमी झाले. या जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असून त्यातील एक बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी ( दि. ०६ ) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान ,१९ जखमी पैकी १० जण जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून ७ जणांवर उपचार करुन सोडण्यात आले आहे. तर ७ जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. त्यातील एक बालक गंभीर जखमी झाल्याने, त्याला पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. राहुल सरदे यांनी सांगितले. तसेच ९ जणांना उपचारासाठी डॉ. माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले तर ७ जणांना उपचासाठी ॲडमिट करण्यात आल्याची माहिती डॉ. राहूल पवार यांनी दिली.
जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील नाणेघाट मार्गावरील खडकुंबे गावातील मुलगी तसेच केवाडी येथील मुलगा यांचा शुभविवाह खडकुंबे येथे होता. लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला. झाडावर असलेल्या मधपोळ्यातील माशा उठल्या आणि माशांनी वऱ्हाडींना लक्ष्य केले. बचावासाठी वऱ्हाडी पळत सुटल्याने माशांनी मंडपात शिरकाव करीत अनेकांना चावे घेतले. या घटनेत १९ जण जखमी झाले, या घटनेने वऱ्हाडी मंडळीनी लग्नसोहळा आटोपता घेतला.
दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांना जशी वाहनाची व्यवस्था होईल त्या पद्धतीने उपचारासाठी जुन्नरला आणण्यात आले. जखमींपैकी ९ जणांना उपचारासाठी डॉ.राहूल पवार यांच्या माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले तर ७ जणांना उपचासाठी ॲडमिट करण्यात आल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.