पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकाल मंगळवारी (दि. १३) जाहीर करण्यात आला. यात राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, गतवर्षाच्या तुलनेत यात १.७१ टक्के घट झालेली आहे. त्याचबराेबर बारावी प्रमाणे दहावीत देखील काेकण विभाग आणि मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्ण हाेण्याचा टक्का मुलांच्या तुलनेत ३.८३ टक्केने अधिक आहे. विशेष म्हणजे यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वात कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी मंगळवारी (दि. १३) पत्रकार परीषद घेत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सचिव देविदास कुलाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित हाेते. परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एकूण २८,०२० खासगी विद्यार्थीपरीक्षा दिली हाेती. त्यापैकी २२,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याचबराेबर २४,३७६ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३,९५४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यातील ९,४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी ८,८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आकडे सांगतात?
- नाेंदणी केलेले विद्यार्थी
१५ लाख ५८ हजार ०२०
- परीक्षा दिलेले
१५ लाख ४६ हजार ५७९
- उत्तीर्ण झालेले
१४ लाख ५५ हजार ४३३
उत्तीर्णतेची टक्केवारी
यंदा - ९४.१० टक्केगतवर्षी - ९५.८१ टक्के
विभागनिहाय निकाल
- कोकण - ९८.८२ टक्के (सर्वाधिक)- नागपूर - ९०.७८ टक्के (सर्वात कमी)
मुलांपेक्षा मुली भारी
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे.
निकालाची वैशिष्ट्य काय?
- एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के
- राज्यातील २३,४८९ पैकी ७,९२४ शाळा शंभर नंबरी- मार्च २०२४ च्या तुलनेत (९५.८१) फेब्रु-मार्च २०२५ चा निकाल (९४.१०) १.७१ टक्केने कमी
श्रेणी निहाय असा लागला निकाल
- विद्यार्थी प्रावीण्यासह (७५ टक्के हून अधिक टक्के)४,८८,७४५
- प्रथम श्रेणीत (६० टक्के हून अधिक टक्के)४,९७,२७७
- द्वितीय श्रेणी (४५ टक्केहून अधिक टक्के)३,६०,६३०
- उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्केहून अधिक टक्के)१,०८,७८१