पुणे : बेराेजगारी दिवसेंदिवस गगणाला भिडत असून, राेजगार मिळवण्यासाठी तरुणाईची एकच झुंबड उडत आहे. शहर पोलिस दलाच्या शिवाजीनगर मुख्यालयातील मैदानावर राबविण्यात आलेल्या कारागृह विभागाच्या महिलापोलिस भरती प्रक्रियेदरम्यान बुधवारी (दि. १९) पहाटे चेंगराचेंगरी झाल्याचे पुढे आले आहे. यात ५१३ जागांसाठी तब्बल ३ हजार मुलींनी हजेरी लावली हाेती. काही दिवसांपूर्वीच मगरपट्टा सिटीतील एका कंपनीत अशीच तरुणाईची झुंबड उडाली हाेती. आता तर राेजगारासाठी पोलीस मुख्यालयातच हा प्रकार घडली. यावरून राज्य सरकारसह प्रशासनाचा ठिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सदरील भरती ही २०२२-२३ मधील रखडलेली आहे. इतर पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली. पुणे कारागृह पोलिस भरतीचा अजूनही ठोस निर्णय होत नव्हता. आता कुठेतरी ही भरती प्रक्रिया पार पडत हाेती आणि चेंगराचेंगरीच्या प्रकाराने त्याला गालबोट लागले. कारागृह पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना? अशी भावना विद्यार्थिनीसह पालकांमध्ये आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, महिला उमेदवारांसह त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केल्यामुळे हा प्रकार घडला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एकाचवेळी महिला उमेदवारांसह त्यांच्या नातेवाइकांनी प्रचंड गर्दी करीत प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यालयाचे गेट तुटले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिस मुख्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी संपल्यानंतर बुधवारपासून महिला उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात केली आहे. यात चार हजार महिला उमेदवारांना भरतीसाठी बोलवण्यात आले होते. इच्छुकांसह आई-वडिल व इतर नातेवाईकही आल्याने पोलिस मुख्यालयाच्या गेटवर प्रचंड गर्दी झाली. पहाटे साडेचारच्या सुमारास गेट उघडल्यानंतर महिला उमेदवारांसह त्यांच्या नातलगांनी एकच गडबड सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. एकाच वेळी शेकडो महिला उमेदवार, नातलगांनी गेटमधून प्रवेशाचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार पडले. त्यानंतर गोंधळ उडाल्यामुळे काही महिला उमेदवारांनी धावपळ सुरू केल्याचे दिसून आले.
घटनेत कोणीही जखमी नाही
मैदानी चाचणीसाठी आलेल्या महिलांसह नातलगांना गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच गेटचा लोखंडी दरवाजा पडल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, घटनेत कोणीही महिला उमेदवार अथवा त्यांचे नातलग जखमी झाले नाही. त्यानंतर लगेचच परिसरात तैनात असलेल्या अंमलदारांसह अधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपकावर सूचना देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, उद्यापासून भरती बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलिस मुख्यालय प्रशासनाने दिली.
कारागृह विभागासाठी भरती प्रक्रियेची जबाबदारी पुणे पोलिसांवर असून, २९ जानेवारीपासून उमेदवारांना बोलावून विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. बुधवारी मैदानी चाचणीसाठी १ हजार ९०० महिला उमेदवारांसह त्यांच्यासोबत इतर नातलग उपस्थित होते. गेटमधून आतमध्ये प्रवेश करताना थोडा गोंधळ उडाल्यामुळे धावपळ झाली. घटनेत कोणीही जखमी झाले नसून, यापुढे भरती प्रक्रियेसाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. - डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, मुख्यालय
नेमंक काय घडलं?
- भरतीसाठी झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडले अन् मुली थेट मैदानावर पळत सुटल्या.- मुलींच्या रांगेत ढिसाळ नियोजन अन् गैरसुविधा, पालकांसह मुलींनी व्यक्त केली तीव्र नाराजी- अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्याची चर्चा.- स्थानिक पोलिसांशी देखील काहींची बाचाबाची