‘लालपरी’ला लक्ष्मी पावली; ३ दिवसांत ६ हजार फेऱ्या, पुणे एसटी विभागाला ६ कोटी रुपये महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:39 IST2025-10-22T15:38:23+5:302025-10-22T15:39:02+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन दिवसांतील फेऱ्यांतून यंदा दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे

‘लालपरी’ला लक्ष्मी पावली; ३ दिवसांत ६ हजार फेऱ्या, पुणे एसटी विभागाला ६ कोटी रुपये महसूल
पुणे : दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आले होते. या तीन दिवसांत एसटीच्या सहा हजार फेऱ्या झाल्या असून, यातून अडीच लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. तीन दिवसांत पुणे एसटी विभागाला सहा कोटी रुपये महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन दिवसांतील फेऱ्यांतून यंदा दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. दिवाळीला गावी जाऊन सण साजरा करणाऱ्यांची संख्या लाखोंनी आहे. त्यामुळे एसटी विभागातून विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकण या सर्व भागात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात तीन दिवस एसटीला प्रचंड गर्दी होती. विशेषत: पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून दररोज एक हजारहून अधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे.
तीन दिवसांत हजार फेऱ्या
गेल्या वर्षीपेक्षा यंदा एकून फेऱ्यांत वाढ झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात गेल्या वर्षी तीन दिवसांत ६०० फेऱ्या झाल्या होत्या. यंदा ९०० फेऱ्या झाल्या आहेत. तसेच विदर्भ आणि खान्देशातदेखील फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. या तीन दिवसांत एकूण अडीच लाख नागरिकांनी प्रवास केला आहे.
बस वाढल्या; उत्पन्न वाढले
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणे विभागासह इतर विभागातील ताफ्यातील बसची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणे विभागातून सर्वाधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर सगळीकडे लालपरीच्या रांगा लागल्या होत्या.
दिवाळीनिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. तीन दिवसात सहा हजार फेऱ्या झाल्या असून, सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा दोन कोटी दहा लाख इतका जादा महसूल मिळाला आहे. -अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग