प्रासंगिक करारातून एसटीला १ कोटी ३० लाखांचे उत्पन्न; पुणे विभागात डिसेंबर महिन्यात ५७३ बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:25 IST2025-01-14T13:25:13+5:302025-01-14T13:25:43+5:30
पुणे विभागात प्रासंगिक करारातून सर्वाधिक १४ लाखांचे उत्पन्न स्वारगेट आगाराला मिळाले आहे

प्रासंगिक करारातून एसटीला १ कोटी ३० लाखांचे उत्पन्न; पुणे विभागात डिसेंबर महिन्यात ५७३ बस
पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात डिसेंबर महिन्यात ५७३ बस विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी आरक्षित झाल्या होत्या. या प्रासंगिक करारामधून एसटीला एक कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागात प्रासंगिक करारातून सर्वाधिक १४ लाखांचे उत्पन्न स्वारगेट आगाराला मिळाले आहे.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष पाहता यावा व त्याची माहिती मिळावी, म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबरपासून शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसंदर्भात नियमावली जारी केली असून, यात सहलीला फक्त एसटी बसचाच वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकार मान्यता असलेल्या शाळांना तब्बल ५० टक्के सवलत या शैक्षणिक सहलीत एसटीकडून दिली जाते. त्यामुळे शाळाही एसटी बसच्या वापरास प्राधान्य देत आहेत.
नोव्हेंबर २०२४ मध्ये पुणे विभागातील १५ आगारांत १०१ एसटी बस सहलीसाठी बुकिंग झाल्या होत्या. यातून एसटीला १४ लाख ९४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर डिसेंबर २०२४ मध्ये ५७३ एसटी बस बुकिंग झाल्या होत्या. यातून एसटीला एक कोटी ३० लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये उत्पन्न घटल्याचे दिसून येते. पुणे विभागात सहलीसाठी सर्वाधिक ९३ बस स्वारगेट आगारात, त्यानंतर राजगुरूनगर आगारात ८४ आणि पिंपरी चिंचवड आगारात ६२ बस बुकिंग झाल्या. जानेवारीतही सहलीसाठी अनेक बस बुकिंग असल्याचे प्रशासनाने सांगितले.