वायुवेग पथकांकडून वाहनचालकांना दणका; १४ हजारांपेक्षा जास्त बेशिस्तांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:37 IST2025-02-12T15:36:46+5:302025-02-12T15:37:24+5:30
बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली आहे.

वायुवेग पथकांकडून वाहनचालकांना दणका; १४ हजारांपेक्षा जास्त बेशिस्तांवर कारवाई
-अंबादास गवंडी
पुणे : महामार्गावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु काही बेशिस्त वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवितात. अशा वाहनचालकांना आरटीओच्या वायुवेग पथकाने दणका दिला असून, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील १४ हजारांपेक्षा बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली आहे.
महामार्गावर वाहन चालविताना अपघात होऊ नये, यासाठी प्रत्येक गाडी ठरविलेल्या वेगाने आणि नियमानुसार चालविणे आवश्यक आहे. तसेच वळण मार्ग, घाट मार्गात गाडीचा वेग कमी ठेवणे गरजेचे असते. परंतु अशा ठिकाणी काही वाहनचालकांकडून ओव्हर स्पीडने (अतिवेग) गाडी चालविण्यात येते. अशा वाहनचालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येते.
याशिवाय ओव्हरलोड (अवजड), लेन कटिंग, ड्रंक अँड ड्राइव्ह, मोबाइल टॉकिंग, सीटबेल्ट, फॅन्सी नंबरप्लेट, अनधिकृत पार्किंग, नो-एन्ट्री, थकीत कर, योग्यता प्रमाणपत्र नाही (फिटनेस तपासणी) यांसह विविध कारणांमुळे पुणे आरटीओकडील वायुवेग पथकाकडून (मोटार वाहन निरीक्षक) कारवाई करण्यात येते. सन २०२३ पेक्षा गेल्या यामध्ये वाढ झाली असून, वाहनचालकांनी नियम पाळून वाहन चालवावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
राज्य महामार्गावरील कारवाई - ६,४३७
राष्ट्रीय महामार्गावरील कारवाई - ७, ५९१
एकूण कारवाई - १४, ०५८
महामार्गावरील वाढते अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाते. राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी १४ हजारांपेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वेगावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे.
-स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे