'त्या' पुस्तकाची प्रत मिळण्यासाठीचा सात्यकी सावरकर यांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:12 IST2025-07-03T20:12:22+5:302025-07-03T20:12:32+5:30
राहुल गांधी यांनी लंडन येथील एका भाषणात सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख केला होता

'त्या' पुस्तकाची प्रत मिळण्यासाठीचा सात्यकी सावरकर यांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी लंडन येथील एका भाषणात सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. 'त्या' पुस्तकाची प्रत मिळण्यासाठी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केलेला अर्ज एमपीएमएलए न्यायालयाने फेटाळला.
आरोपीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, तसेच त्याला त्याच्याविरुद्ध गुन्हेगारी साहित्य सादर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी हा अर्ज नामंजूर केला. दरम्यान, खटल्याची पुढील सुनावणी दि. ११ जुलै रोजी होणार आहे.
लंडन येथे ओवरसीज काँग्रेस, डायसापोरा येथे राहुल गांधी यांचे एक व्याख्यान आयोजित केले होते. त्या व्याख्यानात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका पुस्तकात असे लिहून ठेवले आहे, असा उल्लेख केला होता. 'त्या' पुस्तकाची प्रत राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी आम्हाला द्यावी. असा अर्ज सात्यकी सावरकर यांनी पुणे येथील विशेष न्यायालयात केला होता.
ॲड. मिलिंद पवार यांनी त्या अर्जावर विशेष न्यायालयात युक्तिवाद केला. फौजदारी खटल्यामध्ये ज्याने खटला दाखल केला तो त्यानेच कायद्याने सिद्ध करायचा असतो. खटल्याची नियमित सुनावणी सुरू होण्या अगोदर फिर्यादी पक्षाला बचाव पक्षाकडे कागदपत्रे मागण्याचा अधिकार नसतो. तशी कायद्यात तरतूद नाही. फिर्यादी यांचा अर्ज नैसर्गिक न्याय तत्त्वाला धरून नाही. फिर्यादी सावरकर यांची पुस्तकाची मागणी राहुल गांधी यांच्यावर बंधनकारक नाही. त्यामुळे फिर्यादी यांची मागणी चुकीची आहे, ती कायद्याला धरून नाही. म्हणून फिर्यादी सावरकर यांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी करीत सर्वोच्च उच्च न्यायालयांचे काही महत्त्वाचे न्यायनिवाडे त्यांनी दाखल केले. वरील युक्तिवाद व न्यायनिवाडे विशेष न्यायालयाने ग्राह्य धरले व फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा पुस्तक मागणी करणारा अर्ज फेटाळून लावला. ॲड. योगेश पवार, ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. अजिंक्य भालगरे, ॲड. हर्षवर्धन पवार यांनी काम पाहिले.