राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे, तरीही सकारात्मकता ठेवून बोलावे - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:36 IST2025-08-01T19:34:13+5:302025-08-01T19:36:41+5:30
आपल्याकडे पैशांची, तंत्रज्ञानाची कमी नाही पण इमानदारीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमी आहे

राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे, तरीही सकारात्मकता ठेवून बोलावे - नितीन गडकरी
पुणे: राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे असते, मात्र तरीही सकारात्मकता ठेवून सत्य बोलणे गरजेचे असते. लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा इतका मोठा मी नाही. सगळी मोठी माणसे मोठी असतातच असे नाही असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. बऱ्याचदा जी माणसे दूर असतात तीच मोठी असतात. अनुभवाने ते आपल्या लक्षात येते असे ते म्हणाले.
लोकमान्य टिळक ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी टिळक स्मारक मंदिरात गडकरी यांना देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, डॉ. प्रणती टिळक, डॉ. गीताली टिळक व्यासपीठावर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “सत्ताकारण म्हणजे राष्ट्रकारण नाही. लोकमान्य टिळक व त्यांच्याप्रमाणे अनेकांनी जे केले ते राष्ट्रकारण होते. त्यांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा ऑक्सिजन आपण घेतो आहोत. त्यांना स्वराज्य पाहिजे होते व सुराज्यही. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार झाले पाहिजे. आपल्याकडे पैशांची, तंत्रज्ञानाची कमी नाही. इमानदारीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमी आहे. लोकमान्यांच्या नावाने स्विकारलेल्या या पुरस्काराने आता जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार करण्यासाठीच यापुढे काम करणार आहे.”
उद्योगव्यवसायाच्या क्षेत्रात आपण आता जपानलाही मागे टाकले आहे. अमेरिका पहिली, चायना दुसरा व आपण तिसरे आहोत. येत्या ५ वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत जगात अग्रगण्य होणार आहे अशा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जगात पहिल्या क्रमाकांवर येण्याची क्षमता भारतात आहे. त्यासाठी ‘जगात जे नाही ते आपल्याकडे हवे’ असा विचार करून पुढे जायला हवे. मुंबई बंगळुरू हायवे व्हाया पुणे या रस्त्याचे काम करणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे अवघा दीड तास लागेल तर बंगळुरू फक्त ५ तासात येईल. इलेक्ट्रिक कारविषयी मी बोललो तर त्यावेळी, ‘हे काहीही सांगतात’ असे बोलले गेले. ती कार प्रत्यक्षात आली. आता हायड्रोजन कार येत आहे. नव्या इंजिनच्या कार येत आहेत. लढणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, आपण लढत राहू, त्यातूनच लोकमान्याचे सुराज्याचे स्वप्न पुर्ण होईल असे गडकरी म्हणाले.