इस्रोच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:03 IST2025-10-22T15:02:40+5:302025-10-22T15:03:29+5:30
डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या पहिल्या फळीतील शास्त्रज्ञांमध्ये डॉ. चिटणीस यांचा सहभाग होता

इस्रोच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन
पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस (वय १००) यांचे बुधवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.
डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या पहिल्या फळीतील शास्त्रज्ञांमध्ये डॉ. चिटणीस यांचा सहभाग होता. देशाचा पहिला दूरसंचार उपग्रह इन्सॅटची निर्मिती, देशात टीव्ही आणण्यासाठी केलेला साईट प्रयोग, थुंबा आणि श्रीहरिकोटा या देशाच्या दोन्ही रॉकेट प्रक्षेपण केंद्रांच्या जागांची निवड करण्यात डॉ. चिटणीस यांची महत्त्वाची भूमिका होती. स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (पीटीआय) अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पद्मभूषणसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
एकनाथ चिटणीस यांनी १९७५-७६ मधील सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) ज्याद्वारे नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सहा राज्यांतील २४०० गावांपर्यंत शिक्षण पोहोचले. “उपग्रह म्हणजे आकाशातील शिक्षकच ठरला,” असं ते नम्रतेने म्हणत असे. याच प्रयोगातून पुढे INSAT प्रणालीचा पाया रचला गेला. आणि भारताच्या डिजिटल युगाची सुरुवात झाली. नंतर ते इस्रोच्या Space Applications Centre चे संचालक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात 25 वर्षे अध्यापन केले. 1985 मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला.