मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:48 IST2025-05-11T13:47:01+5:302025-05-11T13:48:00+5:30

एखादा जवान सुट्टीसाठी घरी आल्यांनतर अचानक सीमेवर तणावाचे वातावरण आहे, असा कॉल येतो, तेव्हा कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकतो.

Son given for national service; if anything happens, my heart is hardened! Colonel Nitin Kaldate's mother expresses gratitude | मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना

मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना

पुणे : वडिलांनी मुलाला लष्करात पाठवायचं स्वप्न पाहिलं आणि मुलानं त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याच ठरवलं. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज तो कर्नल पदापर्यंत पोहोचलाय, याचा केवळ आम्हालाच नव्हे, तर संपूर्ण गावाला अभिमान आहे.

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना मनात काहीशी धाकधूक असायची, पण आमची मुले चांगलीच कामगिरी करतील आणि पाकिस्तानला माघार घ्यायला लावतील, याचा सार्थ विश्वास होता आणि आहे. मुलगा देशसेवेसाठी दिलाय. कधीही काही घडलं, तरी आई म्हणून मन घट्ट केलंय... अशी कृतार्थ भावना आज मातृदिनी (दि. ११) कर्नलची आई द्रोपदा सुभाष काळदाते यांनी व्यक्त केली.

एखादा दहशतवादी हल्ला असो की युद्धाचा एल्गार असो, देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकारी, जवान अहोरात्र अखंडपणे प्राणपणाला लावून कामगिरी करत असतात. एखादा जवान सुट्टीसाठी घरी आल्यांनतर अचानक सीमेवर तणावाचे वातावरण आहे, असा कॉल येतो, तेव्हा कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकतो.

त्याला सीमेवर जाण्यासाठी निरोप देताना आईचे काळीज पिळवटते आणि अश्रूंचा बांध फुटतो, तरीही ती माउली काळजावर दगड ठेवून मुलाची पाठवणी करते. अशीच काहीशी हृदयद्रावक कहाणी आहे, कर्नल नितीन काळदाते यांच्या माउलीची. कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) चिंचोळी हे त्यांचं मूळगाव, पण सध्या त्या पुण्यात राहात आहेत.

त्या म्हणाल्या, आम्ही मुलगा शाळेत असतानाच त्याला लष्करात पाठवायचं स्वप्न पाहिलं होतं. साताऱ्यातील सैनिकी शाळेत त्याला पाठविलं. तिथे त्याने पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एनडीएमध्ये त्याने केलेली मेहनत फळाला आली. दुर्दैवाने त्याच दरम्यान त्याचे वडील गेले, पण त्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. रुद्रप्रयाग येथे त्याची पहिली पोस्टिंग झाली. आज उधमपूर येथे तो कर्नल पदावर काम करतोय, याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Son given for national service; if anything happens, my heart is hardened! Colonel Nitin Kaldate's mother expresses gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.