तळेगाव दाभाडेमध्ये ‘कही खुशी कभी गम’; पालिकेच्या २८ जागांसाठी आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:14 IST2025-10-09T12:14:15+5:302025-10-09T12:14:34+5:30
- दिग्गजांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य : १४ जागांवर महिलाराज; अनुसूचित जातीसाठी प्रभाग ३ आणि प्रभाग १० मधील प्रत्येकी एका जागा; अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ४ मधील एक जागा

तळेगाव दाभाडेमध्ये ‘कही खुशी कभी गम’; पालिकेच्या २८ जागांसाठी आरक्षण सोडत
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या २८ जागांसाठी बुधवारी (दि.८) पालिका सभागृहात आरक्षण सोडत पार पडली. पालिकेत १४ जागांवर महिलाराज येणार आहे, तर अनुसूचित जातीसाठी प्रभाग ३ आणि प्रभाग १० मधील प्रत्येकी एका जागा आरक्षित झाली. प्रभाग ४ मधील एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आली. आरक्षण सोडतीनंतर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी जाणवत होती, तर दिग्गज उमेदवार खूश होते. काहींवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.
उपजिल्हाधिकारी अनिता तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, भाजप किसान मोर्चाचे प्रांतिक अध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, गणेश काकडे उपस्थित होते. कन्या शाळेच्या विद्यार्थिनी सई शेजवळ, वैष्णवी तागड, आराध्या भालेकर, नेहा चव्हाण, उमैजा बासडे यांच्याहस्ते सोडत काढण्यात आली.
किशोर भेगडे यांनी इंग्रजी अक्षरातील सहा आणि नऊ एकसारखे दिसत असल्याचा आक्षेप सोडतीदरम्यान नोंदवला. त्यावर उपजिल्हाधिकारी तळेकर यांनी दोन्ही अंक मराठीत असणाऱ्या छापील प्रती काढण्यास सांगितले. त्यानुसार सहा आणि नऊ या प्रभागाची सोडत काढण्यात आली.
भाजपचे पदाधिकारी वैभव कोतुळकर यांनी आरक्षण सोडतीसाठी वापरण्यात आलेली बरणी प्लास्टिकची आणि छोटी असल्याने सोडत व्यवस्थित झाली नाही, असा आक्षेप नोंदवला. यावर उपजिल्हाधिकारी तळेकर यांनी, ‘सुरुवातीलाच आक्षेप नोंदवायला हवा होता,’ असे सांगून आक्षेप फेटाळला. गुरुवार (दि.९) ते मंगळवार (दि.१४) या दरम्यान आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना सादर करता येणार आहेत.
प्रभाग तीन व दहामध्ये सातत्याने ‘एससी’साठी आरक्षण
सोडतीनंतर गणेश भेगडे यांनी काही प्रभागांमध्ये नेहमीप्रमाणेच आरक्षण पडल्याचा आरोप केला. प्रभाग तीन व दहामध्ये सातत्याने अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडत आहे. त्यामध्ये स्त्री-पुरुष असा फरकही होत नाही, असा आक्षेप नोंदवला. त्यावर उपजिल्हाधिकारी तळेकर आणि मुख्याधिकारी सरनाईक यांनी शासनाचा अध्यादेश वाचून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवता येईल, असे सांगितले.
असे आहे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र.१
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र.२
अ. सर्वसाधारण (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र.४
अ. अनुसूचित जमाती (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र.६
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र.७
अ. सर्वसाधारण (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र.९
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण(महिला)
प्रभाग क्र.१०
अ. अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ११
अ. सर्वसाधारण (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र.१२.
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग क्र.१४
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण (महिला)