कुणी बुटात लपलंय, कुणी खिशात बसलंय! ढेकणांनी हाॅस्टेल व्यापून टाकलं अन् उडाली झाेप; विद्यार्थी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:29 IST2025-04-26T13:28:40+5:302025-04-26T13:29:33+5:30

ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सध्या ढेकणांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्रस्त विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली

Someone is hiding in a shoe someone is sitting in a pocket Mosquitoes have covered the hostel and the bed has been blown away students are worried in savitribai phule pune university | कुणी बुटात लपलंय, कुणी खिशात बसलंय! ढेकणांनी हाॅस्टेल व्यापून टाकलं अन् उडाली झाेप; विद्यार्थी त्रस्त

कुणी बुटात लपलंय, कुणी खिशात बसलंय! ढेकणांनी हाॅस्टेल व्यापून टाकलं अन् उडाली झाेप; विद्यार्थी त्रस्त

उद्धव धुमाळे 

पुणे : उच्च शिक्षणासाठी गाव खेड्यातून पुण्यात येणाऱ्या मुला-मुलींसाठी हक्काचे ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. अंगावरचे कपडे, आंथरायला चटई अन् पांघरायला चादर, टाॅवेल, ब्रश, तेल, साबण झाले की बसं... सकाळी लवकर उठून ‘कमवा आणि शिका’त सहभाग घेऊन शारीरिक कष्ट करायचे, त्यानंतर आंघोळ करून विभाग गाठायचे. काही तास झाले की रिफेक्टरी किंवा महाप्रसाद वाटपाच्या ठिकाणी जाऊन पाेटाची खळगी भरायची. त्यानंतर पुन्हा तास आणि त्यानंतर रात्री अकरा-बारापर्यंत जयकर ग्रंथालयात अभ्यास...हा विद्यापीठातील मुला-मुलींचा दिनक्रम. मुलं हाॅस्टेलला येतात ती रात्रीची झाेप घेणे आणि सकाळी फ्रेश हाेण्यापुरतं... विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ढेकणांनी हाॅस्टेल व्यापून टाकले अन् पुरती झाेपही उडाली. ही व्यथा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची.

मागे वळून पाहिले तर पंधरा-वीस वर्षांपूर्वी हेच चित्र हाेते. मागील वीस वर्षांत अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या; पण ढेकणांनी काही विद्यार्थ्यांचा पिछा साेडलेला नाही. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमाेर ‘कमवा आणि शिका’च्या विद्यार्थ्यांची मैफल भरली हाेती. त्याला विद्यार्थी संचालकांसह वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख आणि दस्तुर खुद्द कुलगुरू आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित हाेत्या. ढेकणाने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमाेर कविता सादर केली की ‘ढेकूनमामा ऐक सांगताे... कुणी माझ्या बुटात लपलय रं, अन् कुणी माझ्या खिशात बसलय रं... ही कविता प्रशासनाला इतकी झाेंबली की दुसऱ्याच दिवशी सर्व वसतिगृहांमध्ये पेस्टकंट्राेलची माेहीम राबविली गेली. आज १९ वर्षांनंतर वरिष्ठ बातमीदार म्हणून विद्यापीठात मी जाताे तेव्हा परीक्षेच्या लगबगीत असलेले विद्यार्थी ढेकणांनी बेजार करून साेडल्याचे सांगतात, तेव्हा ढेकूनमामा कविता आठवते. यादरम्यान विद्यापीठाला अनेक कुलगुरू मिळाले. हाॅस्टेलचे रेक्टरही अनेक बदलले गेले. विद्यापीठाच्या परिसरात विकासाची अनेक कामे केली गेली, पण साधे साधे परंतु गंभीर प्रश्न आजही ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले. पुणे ‘स्मार्ट’ झाले, विद्यापीठाचा नामविस्तार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाले तरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनात काहीच बदल झालेला नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या उन्हाळी सत्र परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी अभ्यास करण्यात मग्न आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या ढेकणांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्रस्त विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. रात्री झोपेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ढेकणं इतकं चावत आहे की, त्यामुळे अनेकांना शारीरिक इजा झाली आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रारही दिली. पण विद्यापीठ प्रशासन त्याची गंभीर दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची झाेप माेड हाेऊन शैक्षणिक नुकसान होत आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न विद्यार्थी संघटना उपस्थित करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच विद्यापीठातील वसतिगृहात एका विद्यार्थ्याला उंदीर चावल्याची घटना घडली होती. आता ढेकणांचा चावा असह्य झाला आहे. एरवी विद्यार्थी मगामध्ये पाणी भरून उशाला ठेवतात आणि ढेकूण चावला की त्याला पकडून त्या पाण्याच्या मगात साेडतात. सकाळी मगातील ढेकणं माेजली तर किमान पंधरा-वीस निघतात. याशिवाय खाटांना राॅकेल लावून त्याच्या उग्र वासात झाेपतात, पण ते उपायही आता ताेकडे पडत आहेत. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने वेळीच दखल घेऊन विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज आहे.

ज्ञानाची महासंस्था समजल्या जाणाऱ्या ‘ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट’ अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणे म्हणजे एकप्रकारचा कारावासच आहे. हेच येथील विदारक वास्तव आहे. येथील ढेकूण विद्यार्थ्यांची झाेप उडवत आहे. त्याहून गंभीर म्हणजे विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता. जी विद्यार्थ्यांना अधिक विषारी वाटत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन यावर त्वरित उपाय केले नाही तर विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आक्राेशाला सामोरे जावे लागेल. - शिवा बारोळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

तुरुंगात कैद्यांना जेवढा त्रास नसेल त्यापेक्षा अधिक त्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. मी रात्री झोपेत असताना ढेकणांनी माझ्या पायाला इजा केली आहे. परीक्षेचा अभ्यास करावा की, ढेकणांचा त्रास सहन करावा हेच समजत नाही. त्यामुळे मी वसतिगृह सोडून बाहेर मित्राच्या रूमवर राहायला गेलो. पण विद्यापीठातील बहुतांश मुलांना बाहेर आधारच नसल्याने नाईलाजास्तव येथेच राहावे लागत आहे. या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने त्वरित दखल घेऊन, यावर उपाययोजना कराव्यात, हीच अपेक्षा आहे. - त्रस्त विद्यार्थी

Web Title: Someone is hiding in a shoe someone is sitting in a pocket Mosquitoes have covered the hostel and the bed has been blown away students are worried in savitribai phule pune university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.