काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:02 IST2025-10-25T18:02:10+5:302025-10-25T18:02:57+5:30
जैन समाजाने माझं नाव घेतलं नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं.

काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
पुणे : मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असल्याचा आरोप करत या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध केला आहे. ही जमीन विक्री बेकायदा असून त्याविरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यायचा आहे, असे आवाहन आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज यांनी केले. शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या ताब्यातील भूखंडाबाबत काही व्यक्तींमार्फत विकासकांशी व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा विक्रीकरार आणि त्यानंतरचा कर्जकरार रद्द करावा आणि वसतिगृहाची मालमत्ता वसतिगृह आणि ट्रस्टच्या संबंधित धर्मादाय कारणांसाठीच वापरली जावी, अशी समाजाची मागणी आहे.
त्यानंतर जैन बोर्डिंग जागेबाबत रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मोहोळ यांच्या बिल्डर मित्राने हा व्यवहार केल्याचे पुरावे त्यांनी दाखवले. तसेच त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोपही केले. या सगळ्या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला. जैन बांधवांना न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मोहोळ यांनी जैन बांधवांना दिले आहे.
मोहोळ म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे विषय, राजकीय विषय आहेत, संघटनात्मक विषय निवडणूका यासंदर्भांत भेटायला गेलो होतो. त्याठिकाणी हा विषय आला नाही. एक खासदार म्हणून माझी भूमिका महत्वाची याच्यामध्ये काय असावी? पुढील काळात काय निर्णय घेता येतील याबाबत मी भेटायला जैन बोर्डिंगला आलो होतो. या प्रकरणात राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली. पण माझ्या जैन बांधवानी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही. माननीय राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात. आणि त्यामुळं त्यांनी ही शंका उपस्थित केली होती. कदाचित मी पार्टनरशिप मध्ये असलेल्या विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय. पण ज्यावेळेला मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठंही असा विषय जैन समाजातनं आला नाही. परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं.
जैन बांधवांनी मला भेटण्यासाठी बोलावले होते. या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे रहा. आम्हाला सहकार्य अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर मी ताबडतोब त्यांच्यासोबत याठिकाणी आलो. माननीय गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली. पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली. जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता. माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का? तर आहेत. पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे. आणि मी ते पुराव्यानिशी सादर केलंय. आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथं येताना शंभर वेळा विचार केला असता आणि आलो नसतो. पण समाजाची भावना स्पष्ट, निर्मळ आणि स्वच्छ आहे. आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे. आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली तीही भूमिका मांडली.
गुरुदेवजी यांनी याठिकाणी सांगितलं की, लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे. हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावनाही लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन मी या विषयात आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा राहीन.