जुन्नर बस स्थानकाला सांडपाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:27 AM2017-11-30T02:27:31+5:302017-11-30T02:27:48+5:30

जुन्नर बस स्थानकात चारही बाजूला सांडपाण्याची डबकी साठल्याने बसस्थानकाला सांडपाण्याने वेढलेल्या बेटाचे स्वरूप आले आहे.

 Soldiers on Junnar bus stand | जुन्नर बस स्थानकाला सांडपाण्याचा वेढा

जुन्नर बस स्थानकाला सांडपाण्याचा वेढा

googlenewsNext

जुन्नर : जुन्नर बस स्थानकात चारही बाजूला सांडपाण्याची डबकी साठल्याने बसस्थानकाला सांडपाण्याने वेढलेल्या बेटाचे स्वरूप आले आहे.
या डबक्यातील साठलेले पाणी पुढे थेट रस्त्यावरून वाहत असल्याने बस स्थानकात येणाºया जाणाºया प्रवाशांना हे सांडपाणी तुडवतच पुढे जावे लागते, तर अनेक दिवस साठून राहिलेल्या पाण्याची दुर्गंधी येत आहे. याही त्रासाला प्रवासी, नागरिक यांना सामोरे जावे लागत आहे. काळे हिरवे पाणी साठल्याचे दिसून येत आहे. सांडपाण्याच्या या डबक्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. डासांना अंडी घालण्यासाठी या डबक्यांमुळे अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दुर्गंधी, तसेच डासांचा भडिमार यामुळे नागरिक प्रवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जुन्नर बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाच्या व्यवस्थापणाचे साठलेल्या सांडपाण्याच्या समस्येकडे ध्यान द्यायला अजिबात वेळ नाही, असे चित्र दिसून येत आहे. अनेक दिवस या डबक्यात साठून राहिलेल्या दुर्गंधीयुक्त आरोग्यास धोकादायक पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही.
शिवनेरी किल्ल्याकडे जाणाºया प्रमुख रस्त्यावरच जुन्नर बस स्थानक आहे . बस स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरच दोन डबकी तयार झालेली आहेत. ही डबकी बसस्थानकात कर्मचाºयांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातील पाणी तुंबल्याने तयार झाली आहेत.
बस स्थानकाच्या पूर्वेला सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले आहे. बस स्थानकात प्रवाशासाठी असलेल्या स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा तुंबल्याने स्वच्छतागृहाच्या मागेच कायमचेच सांडपाणी तुंबून राहिले आहे. या मोकळ्या जागेत
साचलेले हे सांडपाणी पुढे वाहून रस्त्यावर आल्याने तेथे पडलेल्या मोठ्या खड्ड्याचे रूपांतर सांडपाण्यााच्या डबक्यात झाले आहे.
बस स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या सीमाभिंतीलगत असलेल्या नगरपालिकेच्या जुन्या गटारातून गळती होऊन आतमध्ये सीमाभिंतीलगत साठते. हे साचलेले पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन बस स्थानकाच्या इमारतीच्या पश्चिमेकडील बाजूच्या व्हरांड्यापुढून वाहत जाते.
हे वाहणारे सांडपाणी पुढे बस स्थानकाच्या इमारतीच्या दक्षिणेकडील व्हरांड्यासमोरून वाहत जाऊन छोटी डबकी तयार करत पुन्हा स्वच्छतागृहातील मोकळ्या जागेत येऊन साचत आहे. अशा प्रकारे एकंदर पूर्ण बसस्थानकाला सांडपाण्याचा विळखा पडल्याने सांडपाणी यांनी वेढलेल्या बेटाचे स्वरूप आले आहे.

नगरपालिकेकडून दखल नाही

बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रकांनी याबाबत नारायणगाव येथील आगारप्रमुखांस कळविले आहे. परंतु याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, परिणामी त्रास मात्र कर्मचारी, प्रवासी, नागरिक सर्वांनाच होत आहे.
अंतर्गत स्वच्छतेची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे, तर नगरपालिकेच्या गटाराचे येणाºया पाण्याबाबत नगरपालिकेस कळविले आहे. त्यांनीदेखील कोणती दखल घेतलेली नाही.
बस स्थानकाच्या स्वछतागृहातील सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन तुंबलेली आहे. ती नवीन करण्यासाठी प्रस्ताव पुणे कार्यालयाने मंजूर केला आहे. याचे काम जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येईल, असे नारायणगावचे आगारप्रमुख आर. डी. मगर यांनी सांगितले.
परंतु तोपर्यंत असाच त्रास सहन करायचा का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. रस्त्यावर वाहणाºया सांडपाण्यामुळे बस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या चांगल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेमुळे सुपे बस स्थानकात आत्मक्लेश उपोषण

सुपे : सुपे (ता. बारामती) येथील एसटी बसस्थानकात येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ यांनी बुधवारी (दि. २९) एकदिवसीय आत्मक्लेश उपोषण केले.
येथील स्वच्छतागृह व शौचालयाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची, तसेच महिलावर्गाची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील बसस्थानक आवारात अद्ययावत स्वच्छतागृह बांधण्याची मागणी मागील पंधरा दिवसांपूर्वी वाघ यांनी केली होती. त्यानुसार कार्यवाही न झाल्यास एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
मात्र एसटी आगारप्रमुखांकडून योग्य ती दखल न घेतल्याने अखेर वाघ यांनी बुधवारी (दि. २९) सकाळी १० ते ५ पर्यंत आत्मक्लेश उपोषण केले.
सुपे हे प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे बारामतीसह पुरंदर आणि दौंड आदी तालुक्यातील गावातील प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र येथील बसस्थानकात प्रवाशांच्या सोई-सुविधा पुरवण्याकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी वाघ यांनी ‘लोकमत’शी
बोलताना केला.

Web Title:  Soldiers on Junnar bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.