सोसायट्या म्हणतायेत, दररोज ६-७ टँकर पुरवा; मागणी पूर्ण करणे अशक्यच, महापालिकेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:49 AM2023-12-27T10:49:32+5:302023-12-27T10:49:58+5:30

महापालिका समाविष्ट गावांमध्ये उभारलेल्या सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांपर्यंत पिण्याचे पाणी देऊ शकते

Societies say provide 6 7 tankers per day It is impossible to fulfill the demand according to the pune municipal corporation | सोसायट्या म्हणतायेत, दररोज ६-७ टँकर पुरवा; मागणी पूर्ण करणे अशक्यच, महापालिकेची माहिती

सोसायट्या म्हणतायेत, दररोज ६-७ टँकर पुरवा; मागणी पूर्ण करणे अशक्यच, महापालिकेची माहिती

पुणे: पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये शंभर-दोनशे सदनिकांच्या सोसायट्या (गृहसंकुल) मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिकेने आपल्याला टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची मागणी असली तरी, महापालिका मात्र हतबल आहे. समाविष्ट गावांमध्ये प्रत्येक सोसायटीची पिण्याच्या टँकरची मागणी पूर्ण करणे अशक्य असून, महापालिका केवळ या गावांमध्ये उभारलेल्या सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांपर्यंत पिण्याचे पाणी देऊ शकते, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

महापालिका आमच्याकडून टॅक्स घेत असल्याने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, असा सूर या गावांमधील सोसायट्यांकडून येत आहे. एकतर लवकरात लवकर पाणीपुरवठ्यासाठी या गावांमध्ये महापालिकेने जलवाहिन्यांचे जाळे विणावे, अथवा जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सध्या स्वत:च्या टँकरसह, ठेकेदारांच्या टँकरकडून तसेच चलनाने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये सर्वाधिक टँकर हे ठेकेदाराचे असून यासाठी महापालिका संबंधितांना प्रती टँकर १,१०० ते १,५०० रुपये दर देते. यापाेटी महापालिका खासगी ठेकेदारांना सुमारे साडेतीन कोटी रुपये दरमहा अदा करते. सन २०२३-२४ मध्ये एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान महापालिकेने खासगी ठेकेदारांच्या दाेन लाख २४ हजार ७२ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे. तर मनपाच्या १८ हजार ३७० टँकरने पाणीपुरवठा केला आहे. याचबरोबर चलनाद्वारे (यामध्ये नागरिक स्वत:चे टँकर पाठवून पिण्याचे पाणी घेतात) २० हजार ५३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे.

उपनगरांमध्ये जास्त मागणी

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या पूर्वीच्या ११ गावांसह आत्ताच्या २३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये शहराच्या पूर्व भागात दररोज हजारो टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जाते. तर नव्या २३ गावांमध्ये सोसायट्यांकडूनही पिण्याचे पाणी टँकरने द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे; पण महापालिकेने त्यास असमर्थता दर्शविली आहे.

दरमहा सरासरी ३३ हजार टँकर

पुणे शहरात महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू असले तरी, त्याचा वेग संथ गतीने सुरू आहे. तर उपनगरांमध्ये ही योजना पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही प्रगतिपथावर नाही. परिणामी, उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर पाठविण्याशिवाय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पर्याय नाही. सध्या महापालिकेच्या वतीने दरमहा सरासरी ३३ हजार टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

पाणीपट्टी घेता मग पाणी द्या

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये महापालिका कर आकारणी सुरू केली आहे. यामध्ये पाणीपट्टीही आकारली जाते. जर तुम्ही पाणीपट्टी घेत असाल तर मग पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही महापालिकेची आहे. एक तर नळाने पाणी द्या व ते शक्य नसेल तर टँकरने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. नाहीतर पाणीपट्टी महापालिकेने आकारू नये. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच.

Web Title: Societies say provide 6 7 tankers per day It is impossible to fulfill the demand according to the pune municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.