पुणे : रस्त्याच्या मध्यभागी झोपणे तरुणाच्या जीवावर बेतले. अंगावरून कार गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोज सुदर्शन बिश्वाल (४५, रा. वडगाव शेरी, मूळ रा. ओरीसा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज बिश्वाल मूळचा ओरीसातील असून, तो १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर रस्त्याच्या मधोमध झोपला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कार चालकाने त्याच्या अंगावर कार चढवली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी कार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप खेडकर करत आहेत.